गोंडा घोळत राष्ट्रवादीच्या नादाला लागू नका : दीपक पवारांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला 

त्यांनी गाडीत महाआघाडीच्या तीन प्रमुख पक्षांच्या टोप्या ठेवाव्यात. ज्या पक्षांचा मंत्री, त्या पक्षाची टोपी घालून फोटो काढावेत. सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला उभे राहिल्याशिवाय अंग भिजत नाही, अशी त्यांची गत झाली आहे, असा टोलाही दीपक पवार यांनी लगावला आहे.
NCP Leader Deepak Pawar And BJP MLA Shivendraraje Bhosale
NCP Leader Deepak Pawar And BJP MLA Shivendraraje Bhosale

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर सातारा व जावलीचे आमदार त्यांच्यापुढे गोंडा घोळत सातारा व कऱ्हाड शासकिय विश्रामगृहात येतात. त्यांनी ही बिलबुलाये मेहमानबाजी यापुढे कायम करावी, पण ते करताना मतदारसंघात दलाल आणि गुत्तेदारांच्या कोंडावळ्यात वावरताना राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे जावलीचे नेते दीपक पवार यांनी दिला आहे. 

यासंदर्भात दीपक पवार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, सातारा जावलीच्या विद्यमान आमदारांच्या घरात राजकिय निष्ठांची मोठी टंचाई आहे. ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाशी ते कधीही प्रामाणिक राहात नाहीत. जनता पक्षात असताना इंदिरा काँग्रेसमध्ये त्यांची उठबस होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस आणि भाजप बरोबर त्यांची उठबस होती.

काहीही कारण नसताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला पण तो पक्ष सोडताना पक्षाच्या पॅनेलमधून ते जिल्हा बॅंकेत निवडून आले. त्याच पक्षाच्या बहुमतावर बॅंकेचे अध्यक्ष झाले. त्याच पदावर ते गुळाला मुंगळा चिकटल्यासारखे चिटकून आहेत. 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थित झाले, त्यामुळे सातारा जावलीचे स्थानिक आमदारांना पुन्हा एकदा सत्ताधारी असणाऱ्या आमच्या नेत्यांचा अनुनेय करावा लागत आहे.

विकास कामांच्या नावाखाली पूर्वी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या मागेपुढे पळत होते. आताही विकास कामांच्या नावाखाली आमच्या नेत्यांच्या पुढे गोंडा घोळत आहेत. सातारा शहरातील रस्त्यासाठी 50 कोटी व साताऱ्याची हद्दवाढ झालीच असे सांगणारे हे आमदार एक वर्षे उलटल्यानंतर लबाड ठरले आहेत. विरोधी पक्षातून निवडून आल्यावर किमान राजकिय नैतिकता संभाळली जाते ती त्यांनी संभाळायला हवी.

पण सातारा जावलीच्या आमदारांना आमच्या पक्षाची कोणीही मान्यवर बोलवत नसताना ते खासगी व संस्थांत्मक दोऱ्यावर आल्यावर शासकिय विश्रामगृह, हॉटेल येथे येऊन लाचार शिष्टता नावाची नवीन परंपरा निर्माण करत आहेत. त्या पक्षाशी तो द्रोह आहे. त्यामुळे ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाशी प्रामाणिक नसतात याची नोंद त्यांच्या पक्षाने घ्यावी. सातारा जावली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम जोरदारपणे सुरू आहे.

त्यामुळे या आमदाराची स्थानिक राजकारणातील लुडबुड आम्ही सहन करण्याचा विषयच नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था त्यांनी पूर्वी वाटण्यासाठी केल्या होत्या. त्या आता वेण्णा धरणांत बुडाल्या आहेत. त्यांचे आमच्या नेत्यांबद्दल प्रेम असेल. पण त्यांनी जावली तालुक्‍यात लुडबुड करू नये. प्रेम खोटे असेल तर त्यांनी
पक्षाच्या बॅनरखाली फिरावे अन्यथा पक्षाच्या चिन्हावर जावली तालुक्‍यात यावे, असे आवाहन श्री. पवार यांनी आमदारांना दिले आहे. 

त्यापूर्वी त्यांनी सातारा जिल्हा बॅंकेत कागद, पेन, स्टेपलर, शाईत सुध्दा चरायचे तातडीने बंद करून अध्यक्षपद सोडावे. अन्यथा स्वत:ला राजकिय बेशरम घोषित करावे. सत्तेचा अगदीच मोह सुटत नसेल तर त्यांनी भाजपमध्ये राहून सकाळी आमच्या नेत्यांचे न चुकता स्वागत करावे. दुपारी आमच्या पक्षाच्या सत्तेचा उपभोग घ्यावा.

त्यानंतर आमच्या पक्षाच्या विरोधात शिमगा करणाऱ्यांच्या सोबत जावे. त्यांनी गाडीत महाआघाडीच्या तीन प्रमुख पक्षांच्या टोप्या ठेवाव्यात. ज्या पक्षांचा मंत्री, त्या पक्षाची टोपी घालून फोटो काढावेत. सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला उभे राहिल्याशिवाय अंग भिजत नाही, अशी त्यांची गत झाली आहे, असा टोलाही दीपक पवार यांनी लगावला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com