आमदाराने 25 जणांत आरती केली आणि पोलिस निरीक्षकाची स्वारी आली : बार्शीत खडाजंगी पेटली

बार्शी शहरात जोरदार चर्चा
आमदाराने 25 जणांत आरती केली आणि पोलिस निरीक्षकाची स्वारी आली : बार्शीत खडाजंगी पेटली
MLA Rajendra Raut

बार्शी : बार्शी (Barshi) शहरातील गणेश मंडळांची आरती करुन आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) जात असतानाच पोलिस निरीक्षक रामदास शेळके (PI Ramdas Shelake) यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे  नेमके कोणाचे चुकले कि कोणाचे योग्य?याबद्दल नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

मंडळाच्या गणेशमूर्तीची आरती संपताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी तेथे पोलिस निरीक्षक रामदास शेळके पथकासह तेथे हजर झाले. आरतीला चार लोकांची परवानगी आहे. शासनाचे आदेश आहेत असं म्हणतच शेळकेंची आमदार राऊत यांचेशी समोरा-समोर चर्चा सुरु झाली. 

``रस्त्यावर फटाके उडवले असून वाढदिवस साजरा केला आहे. पंचवीस जण पळून गेले नियमाने वागावे. तुम्ही आमदार आहात. नियमाने वागा. कारवाई हवी नसेल तर तुम्ही मला तसा आदेश द्या. रस्त्यावर वाद घालू नका. मला लेखी द्या, इश्यू करु नका. मला बोलवा. मी येतो,`` असे पोलिस निरीक्षक शेळके आमदार राऊत यांना बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये आहे.


यावेळी आमदार राऊत यांनी मंडळ रस्त्याच्या आतमध्ये आहे. आरती झाली आहे. पाच ते सहा जणच होतो. तुमची जबरदस्तीची पद्धत आहे. तुम्ही सगळीकडे असचं करता. तुम्ही, दुर्बिण लावून बसणार आहात का?  नियम सगळ्यांनाच सारखे असतात व्यापाऱ्यांनी व्यवसाय करायचा नाही का?मी लोकप्रतिनिधी आहे. मला तुमच्या कामात अडथळा आणण्याची गरज नाही. मी तुम्हाला अडवत नाही. काय करायचे ते करा, असे सांगितले.

दरम्यान आमदार राऊत यांनी सायंकाळी उशिरा पत्रकार परिषद घेऊन सर्व व्यापारी, सामान्य नागरिक यांना शिस्त लागली पाहिजे या मताचा मी आहे. पण त्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक, उपअधीक्षक, नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल, असे मत मांडले. मला व्यापाऱ्यांसह जनतेच्या अडचणींकडेही पाहवे लागणार आहे. अनेकांचे हातावर पोट आहे. त्यांनी जायचे कोठे? रस्त्यावर बसून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंब आहेत.   नागरिकांसह सर्वांना समजले पाहिजे. तसेच नियम व अटी ठरवून जाहीर करण्यात आल्यानंतर कारवाई होणे उचित होईल, असे वाटते. गणेश उत्सवानंतर बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक शेळके यांचेशी बोलणे झाले असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.

बार्शीत मंडळाच्या अध्यक्षासह 25 जणांवर गुन्हा दाखल

शहरातील भोसले चौक येथील जवाहर गणेश मंडळाने गर्दी करुन,फटाके उडवून वाढदिवस साजरा केला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत मंडळाच्या अध्यक्षासह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जवाहर गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार(वय 25), चंद्रकांत पवार(दोघे रा.राऊत चाळ)यांचेसह 25 जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.सहायक पोलिस फौजदार बाळासाहेब नाईकनवरे यांनी फिर्याद दाखल केली.ही घटना बुधवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान घडली.
गणेश उत्सवानिमित्त पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांचेसह पोलिस पथक शहरातून गस्त घालीत असताना भोसले चौकात येताच तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली त्यावेळी मंडळासमोर वीस ते पंचेवीस जण उभे होते तेथे वाढदिवस कार्यक्रम सुरु होता.
गर्दीमध्ये कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघन केले असे फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा,साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून तपास हवालदार माळी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in