Corona-free ZP President Uday Kabule says, take Corona's crisis seriously ... | Sarkarnama

कोरोनामुक्त उदय कबुले म्हणतात, कोरोनाचे संकट गांभीर्याने घ्या....   

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

जिल्हा प्रशासनाच्या कोरोना निवारणासाठी केलेल्या उपाय योजनांचे कौतुक करून श्री. कबुले म्हणाले, सातारा येथील खासगी रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल कराड, बेल एअर हॉस्पिटल येथील प्रशासनाचे काम समाधानकारक आहे. कोरोना विषाणूमुळे अनेक प्रकारचे त्रास होतात, याचा अनुभव या काळात आपल्याला आला.

सातारा : कोरोनाचे संकट मोठे असून यामध्ये धोकाही आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेने कोरोनाचे संकट गांभीर्यांने घेण्याची गरज आहे. आरोग्य विभाग चांगले काम करत असून रुग्ण संख्या वाढत असली तरी मृतांची संख्या नियंत्रणात आहे. प्रशासनाच्या उपाय योजनांना नागरिकांनी साथ दिल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  
उदय कबुले यांनी व्यक्त केला.

कोरोनावर यशस्वीपणे मात करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आता पुन्हा नव्या जोमाने जिल्हा परिषदेत कार्यरत झाले आहेत. काल (मंगळवारी) श्री. कबुले जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांनी कोरोना काळातील आपले अनुभव जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीकांना सांगितले. 

जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्याप्रमाणात वाढत असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी विविध भागांना भेटी देऊन नागरिकांना आधार देण्याचे काम केले. या प्रयत्नात त्यांनाच कोरोनाची लागण झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोरोना बाधित झाल्याने शिरवळसह जिल्हा परिषदेत भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यांचे गाव असलेल्या शिरवळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला.

अध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्यही कोरोना बाधित झाले होते. मात्र या संकटामुळे खचून न जाता उदय कबुले यांनी मोठ्या धीराने या संकटाचा मुकाबला केला. त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी या संकटावर मात केली. जिल्हा परिषदेत काल (मंगळवारी) उदय कबुले कोरोनामुक्त होऊन दाखल झाले. त्यांनी कोरोना काळातील आपले अनुभव जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांना सांगितले. 

जिल्हा प्रशासनाच्या कोरोना निवारणासाठी केलेल्या उपाय योजनांचे कौतुक करून श्री. कबुले म्हणाले, सातारा येथील खासगी रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल कराड, बेल एअर हॉस्पिटल येथील प्रशासनाचे काम समाधानकारक आहे. कोरोना विषाणूमुळे अनेक प्रकारचे त्रास होतात, याचा अनुभव या काळात आपल्याला आला.

कोरोनावर कोणतेही औषध, लस नसतानाही विविध प्रकारच्या उपाय योजना राबवत रुग्ण बरे होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना विषाणूचे संकट मोठे आहे, तसा धोकाही मोठा आहे. सातारा जिल्हातील नागरीकांनी कोरोना विषाणूला गांभीर्याने घेऊन काही त्रास होत असेल तर तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे  आवाहन त्यांनी केले. कोरोनाबाबत जिल्हा प्रशासन चांगले काम करत असून नागरिकांनी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केल्यास कोरोनावर यशस्वीपणे मात करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख