निकृष्ट खते, बियाणे दिल्यास कृषी अधिकाऱ्यावर कारवाई : दादासाहेब भुसे

खरिपासाठी शेतकऱ्यांना 65 टक्के पिक कर्जवाटप झाले असून येत्या 15 जुलैपर्यंत शंभर टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण होईल. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील 49 हजार 209 शेतकऱ्यांना 308 कोटी रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
Agriculture Minister Dadasaheb Bhuse
Agriculture Minister Dadasaheb Bhuse

सातारा : शेतकऱ्यांना उत्कृष्ठ दर्जाची खते व बियाणे मिळणे गरजेचे आहे. पण निकृष्ठ दर्जाचे बियाणे व खते देऊन काही चुकीचे केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रांसह कृषी अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जाईल, असा इशारा कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिला. दरम्यान, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही 50 हजारांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देणार आहोत, पण कर्जमाफीच्या यादीतून जिल्हा परिषद व बाजार समितीच्या सदस्यांना वगळले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले कृषीमंत्री भुसे यांनी आज सातारा जिल्ह्यात येऊन खरिप हंगामाची आढावा बैठक घेतली. याबैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री भुसे म्हणाले, जिल्ह्यात खरिपाच्या 45 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीन, भात, बाजरी व भुईमूग याचा समावेश आहे. काही भागात सोयाबीनच्या बियाण्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तशाच तक्रारी सातारा जिल्ह्यातून आल्यास कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची सूचना केली आहे. 

खरिपासाठी शेतकऱ्यांना 65 टक्के पिक कर्जवाटप झाले असून येत्या 15 जुलैपर्यंत शंभर टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण होईल. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील 49 हजार 209 शेतकऱ्यांना 308 कोटी रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या व उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खते मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कृषी विभागाला आम्ही सूचना केल्या आहेत. पण त्यामध्ये काही चुकीचे आढळल्यास कृषी सेवा केंद्र चालकांसह कृषी अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  कृषी सेवा केंद्रात मिळणाऱ्या सर्व वस्तूंचे दर लावलेला फलक स्पष्ट दिसावा अशा ठिकाणी लावलेला असावा.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत नऊ लाख शेतकऱ्यांचा समावेश असून त्यापैकी तीन लाख 42 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लॉकडाउन संपल्यानंतर जिल्हाधिकारी आढावा घेतील, मगच त्याचे वितरण होईल. सोयाबीन खरेदी केंद्रे वेळेत सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते, यावर मंत्री भुसे म्हणाले, शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. त्यांनी आता मका खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली होती. हे उद्दीष्ट आम्ही पूर्ण केले असून आणखी उद्दीष्ट वाढवून मागितले असल्याचे भुसे यांनी सांगितले. 

प्लॉस्टिकच्या फुलांवर बंदीचा विचार...
जिल्ह्यातील काही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्लॉस्टिकच्या फुलांवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत भुसे म्हणाले, प्लॉस्टिकच्या फुलांमुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबत प्लॉस्टिकच्या फुलांवर बंदी आणण्याबाबत आमचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भंडाऱ्यासाठी वापरण्यात येणारा पिवळ्या रंगाऐवजी हळदीचा वापर करण्याबाबत आम्ही आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com