60 acres of land transferred for Satara Medical College | Sarkarnama

अन्‌ चार पाटलांनी भरविले एकमेकांना सातारी कंदी पेढे 

उमेश बांबरे
मंगळवार, 30 जून 2020

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न तडीस नेण्याचा निर्धार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाढीव जागेचा प्रश्‍न मिटला आहे. आता गुरूवारी (ता. 2) साताऱ्यातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत ते बैठक घेऊन कॉलेजचा आराखडा अंतिम करणार आहेत.

सातारा : सातारा शासकिय मेडिकल कॉलेजसाठी लागणारी जादा 60 एकर जागा काल रात्रीच्या अंधारात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा खोऱ्याकडून वैद्यकिय शिक्षण विभागाकडे देण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिली. त्यामुळे सातारा मेडिकल कॉलेजसाठीच्या वाढीव जागेचा प्रश्न मिटल आहे.

यावेळी श्री. पाटील यांच्यासमवेत साताऱ्याचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने, जिल्हाधिकारी शेखर सिंह,  कृष्णा खोरे व पाटबंधारे विभागाचे अधिकार उपस्थित होते. 

सातारा शासकिय मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्‍न आघाडी, नंतर युती आणि आता महाविकास आघाडीचे सरकार आले तरी मिटलेला नाही. याबाबत दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांच्यापुढे हा प्रश्‍न आमदारांनी उपस्थित केला.

यावर त्यांनी सर्व अधिकाऱ्यांसह तत्कालिन पालकमंत्र्यांनाही कानपिचक्‍या दिल्या. पण कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याचे मेडिकल कॉलेजचे काम सुरूकरण्याचा निर्धार त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत केला. त्यानुसार सध्याच्या 25 एकर जागेत आणखी 60 एकर जागा मिळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना त्यांनी सूचना केली होती.

पण काल दुसऱ्याच दिवशी रात्री उशीरा जयंत पाटील साताऱ्यात आले. त्यांनी कृष्णा खोऱ्यांची तब्बल 60 एकर जागा वैद्यकिय शिक्षण मंत्रालयाकडे देण्याच्या प्रस्तावास त्यांनी मंजूरी दिली. याबाबतची सर्व कागदोपत्री पुर्तता झाल्यानंतर ही जाता वैद्यकिय शिक्षण मंडळाकडे हस्तांतरीत होणार आहे.

याबद्दल जयंत पाटील यांनी स्वत:च्या हाताने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनाही त्यांनी पेढा भरविला. तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जयंत पाटील यांनी पेढा दिला व त्यांना म्हणाले, साहेब तुम्हाला डायबेटीस नाही ना, असे म्हणताच एकच हशा पिकला. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न तडीस नेण्याचा निर्धार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाढीव जागेचा प्रश्‍न मिटला आहे. आता गुरूवारी (ता. 2) साताऱ्यातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत ते बैठक घेऊन कॉलेजचा आराखडा अंतिम करणार आहेत. त्यामुळे अजित पवारांचा हात लागला अन्‌ मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख