प्रतापगड कारखान्याच्या गळीतास कामगारांचा विरोध; थकित देण्यांसाठी आक्रमक पवित्रा - Workers protest against the collapse of Pratapgad factory; Aggressive sanctuary for exhaustion | Politics Marathi News - Sarkarnama

प्रतापगड कारखान्याच्या गळीतास कामगारांचा विरोध; थकित देण्यांसाठी आक्रमक पवित्रा

महेश बारटक्के
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

शासनाच्या त्रिपक्षीय कराराची 15 टक्के वेतनवाढीची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही. कोरोना महामारीच्या कालावधीत ही किसन वीर कारखान्याने कर्मचाऱ्यांना कोणतीच आर्थिक मदत न देता वा-यावर सोडले. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबिंयावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कोणतीही देणी न देता काम सुरु करण्यासाठी वेगळ्या शक्तीचा वापर करुन कामगारांवर दबाब आणला जात आहे. 

कुडाळ (ता. जावळी) : कामगारांची थकित देणी न देताच प्रतापगड साखर कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदिपन करण्याचा निर्णय किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने घेतला. त्यासाठी कामगारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगारांनी कार्यक्रमावेळी आक्रमक पवित्रा घेत कारखाना सुरू करून न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
कामगारांनी आपल्या विविध मागण्यांबाबत प्रसिध्दी पत्रक जारी केले आहे. या पत्रकात प्रतापगड कारखान्याच्या कामगारांनी म्हटले की, प्रतापगड सहकारी साखर कारखाना सन 2012-13 पासून भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याला 16 वर्षाकरीता भागीदारी तत्त्वावर त्रिपक्षीय कराराने चालविण्यास दिला आहे.

करार कालावधीत कामगारांना पगार देणे, बोनस देणे, पीएफ रक्कम भरणे ही सर्व जबाबदारी किसन वीर कारखान्याची आहे. तरीही नोव्हेंबर 2019 पासून आजअखेर कामगारांचे पगार दिलेले नाहीत. तसेच सप्टेंबर 2019 पासून पीएफची रक्कम भरलेला नाही. तसेच मागील तीन वर्षापासून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिलेला नाही.

त्याप्रमाणे शासनाच्या त्रिपक्षीय कराराची 15 टक्के वेतनवाढीची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही. कोरोना महामारीच्या कालावधीत ही किसन वीर कारखान्याने कर्मचाऱ्यांना कोणतीच आर्थिक मदत न देता वा-यावर सोडले. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबिंयावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कोणतीही देणी न देता काम सुरु करण्यासाठी वेगळ्या शक्तीचा वापर करुन कामगारांवर दबाब आणला जात आहे.

अशा प्रकारची नेहमीच अन्यायकारक वागणूक मिळत आहे. कामगारांची प्रलंबित देणी व विविध प्रश्न मार्गी न लावता यंदाचा हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न किसन वीर व्यवस्थापनाने केला. काल अचानकपणे किसन वीर
कारखान्याने कामगारांना व व्यवस्थापनास विश्वासात न घेता परस्पर बॉयलर अग्नीप्रदिपन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास कामगारांनी विरोध केला. यापुढेही विरोध राहणार असल्याचे कामगारांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. बॉयलर अग्नीप्रदिपनावेळी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने यंदाच्या गळीत हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कामगारांना विश्वासात घ्या....

प्रतापगड कारखान्याचा मागील वर्षाचा हंगामही बंद होता. यावेळी तो सुरू व्हावा, ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र यावेळी कामगारांच्या मानसिकतेचा व त्यांच्या सहनशिलतेचाही विचार होणे तितकेच महत्वाचे आहे. शेतकरी व कामगार हे दोन मुख्य घटक असल्याने दोघांनाही दुखवता येणार नाही. हंगाम सुरु करण्यासाठी प्रतापगड व ''किसन वीर''च्या प्रशासनाने कामगारांना विश्वासात घेऊन योग्य तो तोडगा काढणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.  

- दादा पाटील (उपाध्यक्ष, प्रतापगड कारखाना)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख