लवकरच काँग्रेसमध्ये दिग्गजांचे इनकमिंग : बाळासाहेब थोरात - Veteran opposition leader to join Congress soon Says Congress State President Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

लवकरच काँग्रेसमध्ये दिग्गजांचे इनकमिंग : बाळासाहेब थोरात

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

शेतकऱ्यांत जागृती करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. कायदा रद्द करावा, यासाठी दोन कोटी सह्या  काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रपतींना देणार आहोत. महाराष्ट्रातून 50 लाख लोकांच्या सह्या देणार आहोत.

कऱ्हाड : राज्यातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील एकत्र आले आहेत. राज्यात असे कोठेही काँग्रेसच्या नेत्यांत मतभेद असतील तर ते दूर करून आम्ही सर्वांना एकत्र घेऊन काँग्रेस पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात होईल, याची खात्री मला आहे. अनेक जण काँग्रेसच्या प्रवाहात येण्यासाठी इच्छुक असून, लवकरच ते येतील, असाही आशावाद मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
 
काँग्रेस मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. उदयसिंह पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे उपस्थित होते.

सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये काही घडते आहे. मंत्री अशोक चव्हाण यांनी व आम्ही नगरविकास विभागाला निधी कमी मिळाला, असे मुख्यमंत्र्यांकडे मांडले आहे. मुख्यमंत्र्यांनीही निधी देण्याचे मान्य केले आहे, असे सांगून श्री. थोरात म्हणाले, "केंद्र सरकारने घाईघाईत कृषीविषयक कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना काँग्रेसतर्फे विरोध करत आहोत.

काही मूठभर लोकांसाठी कायदे तयार केले आहेत. त्यातून शेतकरी मोडून पडणार आहे. कोल्हापूरला सतेज पाटील आणि सांगलीला विश्वजित कदम यांची जोरदार ट्रॅक्‍टर रॅली झाली. त्यातून शेतकऱ्यांत जागृती करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. कायदा रद्द करावा, यासाठी दोन कोटी सह्या  काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रपतींना देणार आहोत. महाराष्ट्रातून 50 लाख लोकांच्या सह्या देणार आहोत.

सध्या राज्यात साखर पडून आहे. 3,100 दर आहे. त्यातून एफआरपी कशी देणार? गेल्यावर्षीची साखर पडून आहे. यंदाची साखर येणार आहे. त्यामुळे एफआरपी कशी द्यायची हा कारखान्यापुढे प्रश्न आहे. दूध पावडर पडून आहे. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे त्या उद्योगावर संकट आले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख