उदयनराजेंचे वक्तव्य धक्कादायक, आक्षेपार्ह : सचिन सावंत - Udayanraje's statement shocking, offensive says Congress leader Sachin Sawant | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंचे वक्तव्य धक्कादायक, आक्षेपार्ह : सचिन सावंत

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

फडणवीस सत्तेवर असतील तरच मराठा आरक्षण मिळेल अन्यथा नाही असे भाजपा नेते सांगत आहेत. अर्णब गोस्वामी सुद्धा फडणवीस यांचाच सल्ला घेतात का? असा टोला सावंत यांनी लगावला. मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर आल्यापासून संविधान, लोकशाहीची सर्व तत्वे पायदळी तुडवली जात आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणावरुन भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत वादग्रस्त आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्ता द्या, मी मराठा आरक्षण मिळवून देतो, असे म्हणणे धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे. गेल्या सहा वर्षांत ''मोदी है तो मुमकीन है'' अशा भावनेतून संविधानिक संस्थांवर दबाव आणला जात आहे. यातूनच भाजपा नेत्यांमध्ये आलेला हा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, राज्य सरकारने घटनापीठाची स्थापना करावी यासाठी चारवेळा सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. तरी अजूनही घटनापीठ स्थापन झालेले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे.

त्यासाठी निष्णात वकीलांची फौजही काम करत आहे. सरकार या प्रकरणी सर्व प्रयत्न करत असताना काही लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यातून फडणवीस सर्वोच्च न्यायालयालाही प्रभावीत करु शकतात असेच भाजपा नेत्यांना वाटत आहे असे दिसते,  हा विश्वास अत्यंत धक्कादायक आहे.

फडणवीस सत्तेवर असतील तरच मराठा आरक्षण मिळेल अन्यथा नाही असे भाजपा नेते सांगत आहेत. अर्णब गोस्वामी सुद्धा फडणवीस यांचाच सल्ला घेतात का? असा टोला सावंत यांनी लगावला. मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर आल्यापासून संविधान, लोकशाहीची सर्व तत्वे पायदळी तुडवली जात आहेत.

देशातील स्वायत्त संस्था या सरकारच्या बटीक बनवल्या असून त्यांना सरकारच्या हातच्या कठपुतली बाहुल्या केल्या आहेत. मागील काही वर्षातील घटना पाहता हे प्रकर्षाने जाणवते. जनतेला न्यायपालिकांवर अजूनही विश्वास वाटतो पण भाजपाचे लोक प्रभाव पाडून आपण हवा तसा आणि हवा तो निकाल आणू शकतो असे म्हणत असतील तर ते चिंताजनक आहे, असेही सावंत म्हणाले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख