सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रत्यक्ष मतदान आणि निकाल याला वेळ असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज संग्राम देशमुख यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. मी भाजपसोबत आहे, त्यामुळे काही काळजी करू नका, गैरसमज कुणीही बाळगू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप नेत्या चित्राताई वाघ उपस्थित होत्या.
संग्रामसिंह देशमुख यांनी आज सातारा येथे उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने प्रचार केला, किती बैठका घेतल्या याची संपूर्ण माहिती दिली. कोणकोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जातोय, याचा आढावा दिला. त्याचे कौतुक करत उदयनराजेंनी त्यांना विजयी शुभेच्छा देत पेढा भरवला.
.उदयनराजे म्हणाले, ""सध्या पुणे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणूका सुरू आहेत. माझ्याकडे भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे मी स्वागत करतो. ते केलेच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, मी सर्वांना पाठिंबा दिला आहे. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला दरवाजे नेहमी खुले असतात. पण या निवडणुकीत आमचा पाठींबा केवळ भाजपचे संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांनाच आहे. ते खूप चांगले काम करतील, हा माझा विश्वास आहे.
संग्राम देशमुख यांना मी आज स्वागताचा आणि विजयाचा सुद्धा पेढा भरवला आहे.'' ते म्हणाले, ""संग्राम देशमुख माझे अत्यंत जवळचे आणि फार वर्षापूर्वीचे जुने मित्र आहेत. यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतीनिधीत्व प्रकाश जावडेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. भाजपने अनेक कामे मार्गी लावली. त्याची पोहचपावती त्यांना निश्चितपणे मिळेल. संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम केलं आहे. त्याचं निश्चित विजयात रूपांतर होणार आहे, याबाबत आता कोणतीही शंका राहिली नाही.''

