बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला; उदयनराजेंची पवारांवर तोफ  - Those who have done wrong about Maratha reservation must be punished says MP Udyanraje Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला; उदयनराजेंची पवारांवर तोफ 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

आरक्षणाचे दोन राजे बघतील असे म्हणून आमच्या खांद्यावर बंदूक देतायत; परंतु बंदूक तुमच्या हातात होती तेव्हा काय केले नाही. चुकीचे केले असेल त्याला शासन मिळालेच पाहिजे, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा अप्रत्यक्ष तोफ डागली. लोकांनी त्यांना बाजूला केले पाहिजे, असा पुनर्उच्चारही त्यांनी केला. 

सातारा : मराठा क्रांती मोर्चाच्या फार आधीपासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी होती. मंडल आयोगाचा मी काढलेला मुद्दा चुकीचा असता, तर सर्व बाजूंनी टीकेचा भडीमार करत उदयनराजे खोटे बोलतायत, असा दाखविण्याचा प्रयत्न झाला असता. कधी ना कधी बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला अशी परिस्थिती येणारच आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत चुकीचे केले असलेल्यांना शासन झालेच पाहिजे, अशी भूमिका घेत खासदार उदयनराजेंनी आज पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली. 

उदयनराजेंनी परवाच्या पत्रकार परिषदेत मंडल आयोगावेळी इतर मागासवर्गात मराठा समाजाचा समावेश का केला असा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर शरसंधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देण्यासाठी मंडल आयोगावेळी शरद पवार यांच्याकडे आरक्षणाबाबत भूमिका मांडणाऱ्या मराठा महासंघाच्या ॲड. शशिकांत पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. 

उदयनराजे म्हणाले, "मराठा क्रांती मोर्चानंतर आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याचे सांगणारे स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. फार पूर्वीपासून आरक्षणाची मागणी होत होती. मी उपस्थित केलेला मंडल आयोगाचा मुद्दा चुकीचा असता, तर चारही बाजूंनी टीकांचा भडीमार करत उदयनराजे खोटे बोलतायत म्हणून सांगत सुटले असते; परंतु कधी ना कधी बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशी परिस्थिती येणारच आहे.

कोणावर टीका करण्याचा विषय नाही. प्रश्‍न मोठ्या समाजाला न्याय देण्याचा आहे. आरक्षणाचे दोन राजे बघतील असे म्हणून आमच्या खांद्यावर बंदूक देतायत; परंतु बंदूक तुमच्या हातात होती तेव्हा काय केले नाही. चुकीचे केले असेल त्याला शासन मिळालेच पाहिजे, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा अप्रत्यक्ष तोफ डागली. लोकांनी त्यांना बाजूला केले पाहिजे, असा पुनर्उच्चारही त्यांनी केला. 

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. तो वंचित राहता कामा नये. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आड कोणीही येऊ नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांनी प्रतिमोर्चे काढणाऱ्यांनी त्यांच्याकडून मोठे पाप होईल हे लक्षात घ्यावे. समाजात तेढ निर्माण होऊन राज्याचे तुकडे पडतील तशीच परिस्थिती देशात निर्माण होऊन देशाचे तुकडे होण्यासही वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. 

आरक्षणाचा प्रश्‍न राज्याचा 

शशिकांत शिंदेंच्या विनंतीनुसार मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार का, या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, "आमदार शिंदे हे माझे जवळचे मित्र आहेत. ते उत्कृष्ट संसदपटू आमदार आहेत; परंतु दुसऱ्यावर खापर फोडायचे चुकीचे आहे.'' आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी राज्याची आहे. केंद्राचा काही संबंध नाही. तुम्हाला सोडविता येत नसेल, तर बाजूला व्हा. ते स्वत: करत नाहीत आणि दुसऱ्यावर खापर फोडायचे काम करतायत, असा टोलाही त्यांनी लगावला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख