मुर्दाड सरकारला जाग करण्यासाठी स्वाभिमानीचा उद्या जागर : राजू शेट्टी  - Swabhimanib's agitation tomorrow to wake up the government : Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

मुर्दाड सरकारला जाग करण्यासाठी स्वाभिमानीचा उद्या जागर : राजू शेट्टी 

सुनील पाटील 
बुधवार, 2 डिसेंबर 2020

प्रत्येकाला या आंदोलनात जावे असे वाटते. आपण जावू शकत नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी आत्मक्‍लेश आंदोलन केले जाईल. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाईल. संध्याकाळची जेवण घेवूनच शेतकरी हे आंदोलन करतील. रात्रभर भजन, किर्तन करत आत्मक्‍लेश केला जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.

कोल्हापूर : मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक रद्द करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या (गुरुवार) सायंकाळी सात ते शुक्रवारी (ता. 4) सकाळी सात वाजेपर्यंत रात्रभर भजन, किर्तन करत आत्मक्‍लेश जागर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. 

 शेतकरी तर येतीलच पण ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले पाहिजेत असे वाटते त्यांनीही या मुर्दाड सरकारला जागे करण्यासाठी या आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले आहे. श्री. शेट्टी म्हणाले, दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून लाखो शेतकरी कुडकूडत बसले आहेत. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, लाठीमार केला. तरीही ते शेतकरी जागचे हाललेले नाहीत.

त्यांची केवळ एकच मागणी आहे, की सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी तीन कृषी विधेयके केली आहेत. ती तात्काळ रद्द करावित. शेतकऱ्यांना अदाणी आणि अंबानींचे गुलाम करु नका. शेतकऱ्यांने पिकवलेल्या कृषी मालाला हमी भाव मिळाला पाहिजे किंवा त्याचा दर ठरवण्याची मुभा शेतकऱ्यांच द्या, अशी मागणी केली जात आहे. 

मात्र, हे आंदोलन शिखांचे आहे. खलिस्तानवाद्यांचे आहे. असे म्हणून शेतकऱ्यांना हिणवले आहे. या आंदोलनाला प्रांतिय आणि राजकीय रंग दिला आहे. पण सरकारने शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणू नये. त्यांना त्यांच्या हक्काची शेती करु द्यावी, अशी मागणी श्री शेट्टी यांनी केली. कायद्याने बंधनकारक असणारा हमी भाव मिळावा. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

प्रत्येकाला या आंदोलनात जावे असे वाटते. आपण जावू शकत नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी आत्मक्‍लेश आंदोलन केले जाईल. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाईल. संध्याकाळची जेवण घेवूनच शेतकरी हे आंदोलन करतील. रात्रभर भजन, किर्तन करत आत्मक्‍लेश केला जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख