दारू, ताडीविक्रेत्यांना दिलासा देणारा ठाकरे सरकारचा निर्णय - State liquor license fee waiver: decision due to covid situation | Politics Marathi News - Sarkarnama

दारू, ताडीविक्रेत्यांना दिलासा देणारा ठाकरे सरकारचा निर्णय

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 23 डिसेंबर 2020

देशात कोविड प्रादुर्भाव वाढल्याने २५ मार्चपासून देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व मद्यविक्री दुकाने बंद होती. ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. परंतु मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले. सध्या राज्यात ९७७ टीडी एक अनुज्ञप्त्या असून अन्य २८ हजार ४३५ मुख्य किंवा प्रधान अनुज्ञप्त्या आहेत.

मुंबई : कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तीना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच 2020-21 या वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे घेण्याचा ही निर्णय घेतला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

एफएल तीन अनुज्ञप्तीस ५० टक्के, एफएल चार अनुज्ञप्तीस ५० टक्के, फॉर्म ई- अनुज्ञप्तीस ३० टक्के, फॉर्म ई- २ अनुज्ञप्तीस ३० टक्के सूट देण्यात येत आहे. ज्या अनुज्ञप्तीधारकांनी नुतनीकरण शुल्काचा भरणा यापूर्वी केला आहे अशांना या सवलतीचा लाभ पुढील नुतनीकरणाच्या वेळी मिळेल.वर्ष २०२०-२१ या वर्षाकरिता ताडीसाठी करण्यात आलेली सहा टक्के वाढही मागे घेण्यात येईल,

तसेच एक सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी अनुज्ञप्ती शुल्काच्या प्रमाणात तीन महिन्यांचे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येईल. ही सूट समायोजनाद्वारे देण्यात येत असल्याने प्रत्यक्ष परतावा मिळणार नाही. वरील सर्व मद्यविक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. पाच  ऑक्टोबरपासून राज्यातील खाद्यगृहे, व परमिट रूम्समधून आसन क्षमतेच्या ५० टक्केच्या मर्यादेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे त्यांचा व्यवसाय ५० टक्केच होतो आहे. परमिट रूम्समध्ये त्यांच्याकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत सीलबंद विक्री करण्यास १९ मे पासून परवानगी दिली असली तरी ही परवानगी किरकोळ मद्य विक्री दुकानांमध्ये अतिरिक्त गर्दी होऊन नये म्हणून देण्यात आली होती. शिवाय घरपोच मद्य सेवा सुरु असल्याने या कालावधीत त्यांचाही व्यवसाय झालेला नाही.

ताडी व्यावसायिकांचे व्यवसाय पाच ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण बंद असल्याने एक सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील चार महिन्यांची शुल्क माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क हा राज्याच्या महसुली उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. २०१९-२० मध्ये १५ हजार ४२९ कोटी महसूल जमा झाला असून निव्वळ अबकारी अनुज्ञप्ती नुतनीकरण शुल्क ९०९.१० कोटी इतके होते.

देशात कोविड प्रादुर्भाव वाढल्याने २५ मार्चपासून देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व मद्यविक्री दुकाने बंद होती. ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. परंतु मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले. सध्या राज्यात ९७७ टीडी एक अनुज्ञप्त्या असून अन्य २८ हजार ४३५ मुख्य किंवा प्रधान अनुज्ञप्त्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख