सातारा : शेतकरी विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्ली बॉर्डर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून पुकारलेल्या भारत बंदला साताऱ्यातील जनतेने कडकडीत बंद पाळून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. बंदच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातून दुचाकी रॅली काढली होती. पण पोलिसांनी रॅली अडवून युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे व विद्यार्थी सेलेचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांना ताब्यात घेतले.
शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्ली बॉर्डर येथे पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी देशभरातील विविध संघटनांनी आज ''भारत बंद''ची हाक दिली आहे. या बंदला सातारा शहरासह जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यवहार बंद ठेऊन नागरीकांनी कडकडीत बंद पाळला.
बंद काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. विविध संघटनांनी आंदोलनास पाठींबा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. तर ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी किसान आंदोलन समर्थन संयुक्त मंच सातारा यांच्यावतीने पोवईनाका येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. तर महाविकास आघाडीच्यावतीने सातारा शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवसेनेचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, आदी सहभागी झाले होते. पोलिसांनी रॅली अडवून 'युवक'चे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, विद्यार्थी सेलेचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व काही बंद होते.

