सातारा : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात सातारा शहर शिवसेना शाखेच्यावतीने पोवईनाका येथे निदर्शने करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. सरकारने तातडीने भाव वाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाही यावेळी देण्यात आला.
गेल्या एक महिन्यापासून केंद्र सरकार छुप्या पद्धतीने दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत १५ पैसे, २० पैसे अशी वाढ करून लोकांच्या नजरेमध्ये धूळ फेकून सतत दरवाढ करत आहे. गेले एक महिन्याभरात जवळजवळ पाच ते सहा रुपये दरवाढ झालेली आहे. ही बाब जनतेच्या लक्षात येणार नाही. अशा पद्धतीने भाववाढ केंद्र सरकार करत आहे.
कोविडच्या काळामध्ये नागरिक आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेले आहेत. ग्रामीण भागात वडाप वाहतूक शेतीसाठी लागणारे डिझेल तसेच भाजीपाला इतर ट्रान्सपोर्ट वाहतूक या दरांत सुद्धा यामुळे वाढ झालेली आहे. परंतु रिक्षा, टॅक्सी, टेम्पो वाहतूकदार यांना भाडेवाढ शासनाकडून करून मिळत नाही. एसटी महामंडळ सुद्धा डबघाईला आलेले आहे. त्यांना पण डिझेल दरवाढीचा फटका बसलेला आहे.
यासर्व नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सातारा शहर शिवसेनेच्या वतीने केंद्र व मोदी सरकारचा जाहीर निषेध करून पोवईनाक्यावर निदर्शने करण्यात आली. सातारा शहर प्रमुख निमिष शहा यांनी सायकल चालवत निदर्शने केली. यावेळी सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, सातारा तालुकाप्रमुख अतिश ननावरे, ॲड. शिरीष दिवाकर, मारुती वाघमारे, सयाजी शिंदे, जितेंद्र वाघंबरे, सुनील भोसले, नंदू केसरकर, सौ. मीनल शहा, भगवानराव शेवडे, सुनील भालेराव, राजेंद्र नाईक, विशाल साळुंखे, अमित देशपांडे, प्रदीप दप्तरदार, सुभाष पवार, मोहित शहा, कांचन डांगरे, जितेंद्र महाडिक, सचिन शिंदे, योगेश शेलार, सुमित नाईक सहभागी झाले होते.

