कुडाळ : मी उदयनराजे भोसले यांना पराभूत केलेला आमदार असून मी कुरघोड्या करत नाही. शशिकांत शिंदेच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका. तसा कोणताही प्रयत्न मी केलेला नाही. माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही, असा इशारा भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, पंचायत समिती उपसभापती सौरभ शिंदे, माजी सभापती मोहनराव शिंदे, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी जर एखादी गोष्ट केली असेल तरच केली म्हणा, न केलेल्या कामाचे खापर माझ्यावर फोडू नका, ते मला कधीच मान्य नसेल, असले राजकारण करायचे असते तर शशिकांत शिंदे ज्यावेळी जिल्ह्यात आले त्याच वेळी त्यांच्या विरोधात काम केले असते. पण शरद पवार साहेबांनी जी दिलेली जबाबदारी ती आम्ही पार पाडली होती. कोरोगावच्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता हा शशिकांत शिंदेच्या बरोबरच होता.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील का म्हणत नाहीत की शिवेंद्रसिंहराजेंनी विरोधात काम केले. जावळीचा विषय आला की दरवेळी माझ्यावर आरोप केले जातात पण मी ते खपवून घेणार नाही, मी दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे, माझे काम सरळ मार्गी आहे, माझे घर राजकारणावर चालत नाही, मी आमदार असलो नसलो मला फरक पडत नाही, माझी ओळख ही छत्रपतींचा वारसदार आहे. ही माझ्यासाठी मोठी गोष्ठ आहे, मी जे बोलतो तो मी करतोच, आणी जे करतो ते छाती ठोकपणे मी सांगतो, जावळीचा सर्वांगिण विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे.
मी खुनसी प्रवृत्तीचे राजकारण कधीच करत नाही, ज्याला माझे पटत नसेल त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे, जे सच्चे आहेत, एकनिष्ठ आहेत त्यांना सोबत घेऊन मी पुढे जाणार आहे, माझ्या जास्त सभ्य व शांत राहण्याचा काहीजन गैरफायदा घेतात पण यापुढे ते चालणार नाही, मी जरी भाजपात असलो तरी माझी राज्याच्या राजकारणात कीती ताकद आहे, माझ्या शब्दाला कीती किंमत आहे हे मला माहिती आहे. ते मी मतदारसंघात करत असलेल्या कामांवरून मी ते दाखवूनही दिले आहे.
माझी स्पष्ट भुमिका आहे. केवळ कामापुरते माझ्याकडे यायचे व मला गरज असली की विरोधकांच्या सोबत फिरायचे हे यापुढे चालणार नाही, टाळी एका हाताने वाजत नसते. नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याचप्रमाणे मलाही माझी राजकीय वाटचाल करणे गरजेचे आहे. मला माझे भविष्यातील राजकीय धोके आोळखून काम करावे लागणार आहे त्यासाठी काहीवेळा कटू निर्णही घावे लागणार आहेत.
भाजपात गेलो म्हणून काय चुक झाली
पक्ष पक्ष म्हणजे काय, मी भाजपात गेलो म्हणून माझी काय चुक झाली का, असा सवाल करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, माझ्या काही अडचणी होत्या काही अंतर्गत विषय होते त्यामुळे मला निवडणुकीत अडचणी आल्या असत्या, मह्णून राजकीय धोके आोळखून मला निर्णय घ्वावा लागला, मी भाजपात गेलो तरी मी माझ्या सोबत असणाऱ्या कोणाचेही राजकीय भवितव्य धोक्यात घातले नाही, मी कोणावरही जबरदस्ती केली नाही, राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात, मला माझ्या बरोबर कायम राहतील अशा सर्वांची गरज आहे, त्यांना मी बरोबर घेऊन पुढे जाणार आहे.

