माझ्यासाठी माझा सर्वसामान्य कार्यकर्ता महत्त्वाचा. नेते काय... ते तर मी आजही शंभर घडवू शकतो. शरद पवार यांची पन्नासहून अधिक वर्षांची राजकीय कारकीर्द समजून घेण्यासाठी हे एक वाक्य पुरेसं आहे. शरद पवार...गेली पन्नास वर्षे महाराष्ट्राची राजकीय स्पेस व्यापून राहिलेलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं जादुई नाव. राजकारण, मग ते उत्तरेकडचे असो वा दक्षिणेकडचे. पवार या नावामुळे ते नक्कीच ढवळतं.
कधी दिल्लीतल्या दरबाराला धडकी भरवतं, तर कधी मध्य-पूर्वेतल्या कुठल्याशा राज्याला "मसलती' देतं. आजवर शरद पवारांना जसं महाराष्ट्राने नितांत आणि निर्व्याज्य प्रेम दिलं, तसंच ते सातारकरांनीही दिलं. खरेतर सातारा जिल्ह्याचं आणि पवारांचं एक वेगळं नातं आहे. पवारांसाठी हा जिल्हा नेहमीच हळवा राहिलेला आहे. म्हणूनच सत्ता असो वा नसो, पवार जेव्हा जेव्हा साताऱ्यात येतात, तेव्हा तेव्हा लोकांचं मोहोळ त्यांच्याभोवती असतं.
जनसामान्यांची ही गर्दी आपली कोणती कामे घेऊन आलेली नसते,
तर पवारांचा एखादा कटाक्ष तरी आपल्यावर पडावा, एवढी साधी अपेक्षा उराशी बाळगून आलेली असते. सातारा जिल्ह्याने यशवंतरावांनंतर शरद पवार यांनाच असं भरभरून प्रेम दिलं. पवारांच्या राजकारणाला बळकटी देण्याचं काम या मातीनेच केलं. यशवंतरावांपाठोपाठ त्यांचा उजवा हात मानले गेलेले किसन वीर यांनी पवारांना राज्याच्या पटलावर येताना पाठिंबा दिला.
पवारांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्याबाबत किसन वीरांनी घेतलेल्या भूमिकेमागे नेतृत्व पुढे नेण्याचा या मातीचा गुणधर्मच असावा. त्यानंतर पुढे पवार अनेक वेळा मुख्यमंत्री झाले. केंद्रातही गेले. कधी काळ सत्तेबाहेरही राहिले. राज्यात सरकार कोणतेही असले तरी मात्र सातारा जिल्ह्याच्या केंद्रस्थानी राहिले. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरही त्यांना सातारा जिल्ह्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पक्षाला नऊ आमदार आणि दोन खासदारांच्या रुपाने पाठबळ दिले, त्यामागेही पवारांचं नेतृत्व मोठं व्हावं, हीच या मातीची भावना असावी.
पवारांच्या चढत्या- उतरत्या सर्वच काळात इथली जनता त्यांच्या सोबत राहिली. त्यात कुठेही लोकांचा स्वार्थ दिसला नाही. लौकिकार्थाने ज्याला "विकास' म्हणतात, तेवढीच काय ती अपेक्षा लोकांनी ठेवली असावी.
अर्थातच पवारांनीही कधी सातारावासियांना अवाजवी स्वप्ने दाखवली नाहीत. साताऱ्याचे स्वित्झरलॅंड करू, असं सर्वकालीन खोटं आश्वासन त्यांनी कधी दिलं नाही. मात्र ज्या ज्या वेळी दुष्काळी पट्ट्यात संकटे आली, त्या त्या वेळी ते धावून आले. साखर कारखानदारीचे प्रश्न निर्माण झाले, तेव्हा कोणताही पक्षीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतली. त्यांचे अनेक साखरसम्राट विरोधकही कारखानदारीच्या प्रश्नावर आजही पवारांकडे मार्गदर्शनासाठी जातात, ही वस्तुस्थिती आहे.
पवारांच्या या नेतृत्वगुणांमुळेच सातारा जिल्ह्यात त्यांचे अनेक राजकीय पाठीराखे तयार झाले. पवारही नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिले. त्यांना ताकद
दिली. कऱ्हाडच्या मातीतला शामराव अष्टेकर यांच्यासारखा एक प्रामाणिक सर्वसामान्य कार्यकर्ता मंत्रिपदापर्यंत पोहोचतो. यात अष्टेकरांचे कर्तृत्व जेवढे महत्त्वाचे, तेवढाच हा पवारांच्या अदृश्य शक्तीचाही परिणाम. एवढंच काय पण राजकीय बेरीज वजाबाकीची गणिते बसवताना काहींना मान्यता मिळण्याची जादूही पवारांच्या नेतृत्वामुळे पाहायला मिळाली.
पवार आणि सातारा जिल्ह्याचं नातं हे असं आहे. जे कायम टिकून राहिलं आहे. अधिकाधिक घट्ट होत गेलं आहे. हे असं का? पवारांसाठी सातारा जिल्हा एवढा हळवा का, या प्रश्नांची उत्तरे खरेतर साताऱ्याच्या मातीशी निगडित आहेत. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात डोकावलं, तरी तुम्हाला साताऱ्याच्या या भूमीत मातीशी इमान राखणारी अनेक माणसे भेटतील.
या भूमीत नेहमीच कणखरतेचे पूजन झालेले आपल्याला दिसेल. अशा अनेक कणखर नेतृत्वाच्या पाठीशी इथली जनता नेहमीच उभी राहिलेली आहे. याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. थोडक्यात काय तर नेतृत्व जोपासणं हा
इथल्या मातीचा स्थायीभाव आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांना मिळालेलं या मातीच प्रेम हे या नेतृत्व जोपासण्याच्या परंपरेचंच द्योतक असावं.
पवारांनी इथल्या अनेकांना घडवलं, वाढवलं, मोठं केलं. राजकारणाच्या सारीपटावर त्यांच्यापासून अनेकजण दूरही गेले; पण सर्वसामान्य माणसाची निष्ठा कायम त्यांच्यासोबत राहिली आहे. त्यांचं राजकारण धूर्त असेलही; पण माणसे कमावण्यात ते सार्थ ठरले आहेत. वस्ताद सगळेच डाव शिकवत नसतो. एक डाव राखून ठेवत असतो, हे त्यांच्याच कुठल्याशा भाषणात ऐकलेलं वाक्य त्यांना राजकारणातील चाणक्य का म्हटलं जातं, याची प्रचिती देते.
त्यांचे राजकीय विरोधक पवारांचा शेवटचा डाव शोधण्यात गुंतून राहतात, तोपर्यंत पवारांचा पुढचा डाव तयार असतो. मधल्या काळात झालेल्या राजकीय उलथापालथीत पवारांचे राजकारण आता संपलं, अशी आवई उठवण्यात आली. थकलेला पैलवान आता आखाड्यातील मातीत पाय घट्ट रोवून उभा कसा राहणार, अशा प्रश्नांचे जंजाळ उभे करण्यात आले; पण साताऱ्याच्या याच मातीत भर पावसात पवारांनी जनतेला आणि जनतेने पवारांना आपल्या प्रेमात न्हाऊ घातलं.
पावसाचं तांडवही आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांपुढे येण्यापासून या 79 वर्षांच्या योद्ध्याला रोखू शकले नाही. सातारकरांच्या प्रेमापोटीच पवार भर पावसात सभेला सामोरे गेले. चराचर ओथंबणं म्हणजे काय हे त्या दिवशी साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आणि एका रात्रीत सत्तेने कूस बदलली. इतिहास रचला गेला. विरोधक अजूनही त्यातून पुरते सावरलेले नाहीत. ही "भीजकथा' साताऱ्याच्या मातीत घडली, हा या तपशिलातील महत्त्वाचा भाग! सातारा जिल्हा पवारांसाठी किती हळवा होऊ शकतो, हे पटवून देणारा...

