उदयनराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद; १२३ ग्रामपंचायती बिनविरोध - Response to Udayanraje's appeal; 123 Grampanchayats without opposition | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद; १२३ ग्रामपंचायती बिनविरोध

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 5 जानेवारी 2021

६५४ ग्रामपंचायतीत मतदान होणार आहे. त्यासाठी ९५२१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सातारा तालुक्यातील दोन तर जावळी तालुक्यातील एक अशा तीन ग्रामपंचायतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील तब्बल १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच ९८ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या असून उर्वरित ६५४ ग्रामपंचायतींतून ९५२१ उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांशी ग्रामपंचायतीत दुरंगी किंवा तिरंगी लढती होत असून महाविकासचा फॉर्म्यूला सातारा जिल्ह्यात दिसत नसल्याचे चित्र आहे. 

सातारा जिल्ह्यातील मार्च ते डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या ८७८ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या माध्यमातून
७२६६ उमेदवार ग्रामपंचायतीत निवडून येणार आहेत. त्यासाठी १७ हजार ६५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखरेच्या दिवशी ५५८८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

त्यामुळे १२ हजार १५२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. कोरोनाचे संकट लक्षात घेता स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध करण्याचे आवाहन साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ८७८ पैकी १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर ९८ ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या आहेत.

यातून २६३१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.  त्यामुळे प्रत्यक्ष
६५४ ग्रामपंचायतीत मतदान होणार आहे. त्यासाठी ९५२१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सातारा तालुक्यातील दोन तर जावळी तालुक्यातील एक अशा तीन ग्रामपंचायतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या अशी आहे. सातारा २१, कऱ्हाड १७, पाटण १८, कोरेगाव तीन, वाई नऊ, खंडाळा सहा, महाबळेश्वर नऊ, फलटण सहा, जावळी १२, माण १३, खटाव नऊ.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख