पदवीधर, शिक्षकसाठी महाविकास आघाडीचा कस लागणार : रामराजे - Ramraje appealed to the office bearers and activists of all parties to show their strength | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधर, शिक्षकसाठी महाविकास आघाडीचा कस लागणार : रामराजे

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

दोन्ही मतदारसंघात जास्तीतजास्त मतदान होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. विचारांना साथ देऊन पदवीधर व शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. या निवडणुकीत आपण सक्रिय सहभाग घेणार असून, सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी येथे केले.
 
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजन बैठकीत रामराजे बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, "पदवीधर'चे उमेदवार अरुण लाड, जयंत आजगावकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

दोन्ही मतदारसंघात जास्तीतजास्त मतदान होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. विचारांना साथ देऊन पदवीधर व शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.

साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादी संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे सर्वांनी सावध होणे गरजेचे आहे. आपल्याच काही लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले पाहिजेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

मतदार नोंदणी चांगली झाली आहे. मतदारांना आपल्याकडे आणण्यासाठी प्रत्येकाने काम करावे. पालकत्व बाळसाहेब पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला विजय खेचून आणायचा आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले. 

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये मतदान बाद होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सर्वांना कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. मायक्रोप्लॅनिंग करा. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी पार पाडा. ताकदीने लढावे लागेल. भाजपला आपली ताकद दाखवायची आहे. एकत्र आलो की चमत्कार घडतो हे त्यांना दाखवून देऊ, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

विजय आपलाच आहे, तरीही झगडावे लागणार आहे. मायक्रोप्लॅनिंग करावे लागेल. वेळ कमी आहे म्हणून शांत बसून चालणार नाही, असे मत अरुण लाड यांनी व्यक्त केले. नोंदणी झालेल्या प्रत्येकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया, असे जयंत आजगावकर या वेळी म्हणाले. 

''हैदोस'' काय हे स्पष्ट करा..... 
भाजपच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारने हौदोस मांडला आहे, असा उल्लेख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर आजच्या मेळाव्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. "हैदोस म्हणजे काय याचा अर्थ चंद्रकांतदादांनीच स्पष्ट केला पाहिजे. तो काय असतो, हे त्यांनाच अधिक माहित असावे.'' सरकारने कोणतेही आंदोलन थांबवलेले नाही, कोणत्याही घटकावर दडपशाही होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख