सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघात पदवीधर विरुध्द साखर कारखानदार असा मुकाबला होत आहे. ज्या कारखानदारांनी काटा मारत खिसे भरले. त्यांनाच प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिली आहे. काटा मारणाऱ्या या उमेदवारांचा काटा पदवीधर काढतील, असा सूचक इशारा अपक्ष उमेदवार डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी दिला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत डॉ. कोकाटे हे उमेदवार असून, त्या प्रचारासाठी ते आज सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. गेली दोन वर्षे आम्ही या मतदारसंघात काम करत असून, पदवीधर विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी माझा प्रयत्न राहिल.
डॉ. कोकाटे म्हणाले, चारही पक्षांकडून यापुर्वी अनेक वेळा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पडीक उमेदवारांना नाकारत पदवीधरांनी इतिहास घडविण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री. कोकाटे म्हणाले," पदवीधर विरुध्द साखर कारखानदार असा मुकाबला पुणे विभागात होत आहे.
ज्या कारखानदारांनी काटा मारत खिसे भरले. त्यांनाच प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिली आहे. काटा मारणाऱ्या या उमेदवारांचा काटा पदवीधर काढतील.'' प्रवीणदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या कार्यपध्दतीवर टीका करत कोकाटे यांच्या विजयाचा दावा केला.

