शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला एकत्र आणण्यात पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा वाटा  - Prithviraj Chavan played a major role in bringing Shiv Sena, NCP and Congress together | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला एकत्र आणण्यात पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा वाटा 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

काका-बाबांना जनतेने एकत्र आणले आहे. काँग्रेसकडे नवीन कार्यकर्ते येत आहेत. काँग्रेसचाच विचार देशाला तारणार आहे. काहीजण स्वप्नात शपथ घेत होते. मात्र, त्यांची निराशा झाली, असा टोला त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना लगावला. जनतेच्या अंत:करणात काँग्रेसचाच विचार आहे.

सातारा : विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागणार असे वाटत होते. मात्र, आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आणली आणि सरकार बनविले. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. आम्ही जातीयवादी पक्षांना दूर ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विकासाचा कोणताच मुद्दा भाजपकडे नसून केवळ धार्मिकतेच्या मुद्द्यावर लोकांत तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. त्यांचे खरे स्वरूप जनतेला कळले आहे. त्यामुळे बिहारमध्ये निश्चितपणे सत्तांतर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

साताऱ्यातील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.  ते म्हणाले, भाजपमधील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात चलबिचल आहे. विविध गोष्टी करून भाजपचे नेते पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागणार असे वाटत होते. मात्र आम्ही सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आणली आणि सरकार बनविले. यामध्ये पृथ्वीराज
चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. आम्ही जातीयवादी पक्षांना दूर ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास व्यक्त करून ते म्हणाले, काँग्रेस पक्ष जो विचार मानतो तो राज्य घटनेशी निगडित आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळ, खातेवाटप झाले.

त्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटात ही आम्ही काम करत आहोत. आगामी काळात काँग्रेसला आणखी ताकतीने आंदोलने करावी लागतील. लोकांचे प्रश्‍न घेऊन उतरावे लागणार आहे. काका-बाबांना जनतेने एकत्र आणले आहे. काँग्रेसकडे नवीन कार्यकर्ते येत आहेत. काँग्रेसचाच विचार देशाला तारणार आहे.

काहीजण स्वप्नात शपथ घेत होते. मात्र, त्यांची निराशा झाली, असा टोला त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना लगावला. जनतेच्या अंत:करणात काँग्रेसचाच विचार आहे. कार्यकर्त्यांनी आता कंटाळा करता कामा नये. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मंत्रीमंडळात मान्यता घेऊनच राज्यपालांकडे दिली आहे.

मुळात आमदार निवडीचे सर्वाधिकार राज्य घटनेने मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळाने दिलेली विधान परिषदेच्या आमदारांची यादी राज्यपालांना मंजूर करावी लागेल.  अर्णव गोस्वामीचा विषय हा लोकशाहीवरील विषय नाही. भाजपने त्या काळात हे प्रकरण दाबले होते, ते आता उघड झाले आहे, अशी टिकाही त्यांनी भाजपवर केली.

 बिहारच्या निवडणुकीत सत्तांतर होईल असे तुम्हाला वाटते का, या प्रश्नावर मंत्री थोरात म्हणाले, बिहारमध्ये निश्चितपणे सत्तांतर होईल, कारण सध्या तेथील वातावरण बदलत चालले असून केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण जाऊ लागले आहे. हाथरसची घटना, उत्तर प्रदेशातील घटना, वाढलेली महागाई, युवकांच्या नोकऱ्या जात आहेत. या सर्व परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.

विकासाचा कोणाताच मुद्दा भारतीय जनता पक्षाकडे नाही. त्यांच्याकडे केवळ
धार्मिकतेचा मुद्दा असून त्यामाध्यमातून ते लोकांत धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. जनतेने त्यांचे खरे स्वरूप ओळखले आहे. त्यामुळे बिहारमध्ये निश्चित आमचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसचे चाळीसहून अधिक नेते भाजपने पळविले....

 पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जातीयवादी पक्षात जे गेले ते जाऊ द्यात. चाळीसहून अधिक कॉंग्रेसचे नेते भाजपने पळविले. अनेकांनी आपली अडचण सांगितली. भाजपने साम, दाम, दंड, भेद ही निती अवलंबली. कॉंग्रेस मोडून काढणे हीच भाजपची रणनिती असून अमित शहा तेच करत आहेत. लोकशाही मानणाऱ्या संस्था गिळंकृत केल्या आहेत. त्याला आता आपण रोखायचे आहे. आपले सवतेसुभे जातीयवादी पक्षाला फायदेशीर ठरत आहेत, त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख