सातारा : पवार साहेब नेहमी अतिशय संयमी भाषेत व शैलीत विरोधकांवर टीका करतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जाहीर कडवी टीका सुरू केली. तेव्हा मात्र, त्यांनी त्याला उत्तर द्यायचं ठरवलं. उस्मानाबादच्या एका सभेपासून त्यांनी स्वतःची भाषणशैली बदलली. आक्रमक व टोकदार टीका सुरू केली. तरूण मंडळींना ही शैली फारच भावली. पुढील सभांतही त्यांनी त्याच शैलीत भाषणं करणं सुरू ठेवलं. त्यांची भाषणं गाजू लागली. पण माझी आई मात्र, टीव्हीवर ते पाहून अस्वस्थ झाली. तिनं मला फोन केला, अग तुझे वडील कसे भाषण करताहेत ते बघ जरा. त्यांना सांग की हे थांबवा, अशा शब्दात खासदर सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या त्या भाषण शैलीचा आई प्रतिभा पवार यांनाही कसा धक्का बसला होता, याची आठवण सांगितली आहे.
शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिलेल्या लेखामध्ये त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, बाबा नेहमी अतिशय संयमी भाषेत व शैलीत विरोधकांवर टीका करतात.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी विरोधकांनी आमच्यासमोर कुणी पैलवानच नाही. ही एकतर्फी निकाली कुस्ती आहे, असा जाहीर पवित्रा घेतला होता.
तेव्हा मात्र, पवारांनी त्याला उत्तर द्यायचं ठरवलं. मला आठवतं बहुधा उस्मानाबादच्या एका सभेपासून त्यांनी स्वतःची भाषणशैली बदलली. आक्रमक व टोकदार टीका सुरू केली. तरूण मंडळींना तर ती शैली फार भावली. पुढील सभांमध्ये त्यांनी त्याच शैलीत भाषणं करणं सुरू ठेवलं.
त्यांची भाषणं गाजू लागली. पण माझी आई मात्र, टीव्हीवर ते पाहून अस्वस्थ झाली. तिनं मला फोन केला., मीही इतरत्र प्रचार दौऱ्यात होते.
आई मला म्हणाली, अग, तुझे वडील कसे भाषण करताहेत ते बघ जरा, आणि त्यांना सांग की, हे थांबवा. मी तिला म्हणाले, तूही त्यांना फोन करून सांगूशकतेस, मला हे काम सांगू नकोस. मला माहिती होतं. ते आमचं ऐकणार नाहीत. साताऱ्याच्या शेवटच्या सभेत जोरदार पाऊस सुरू झाला
होता. तरी त्यांनी सभा आटपायला नकार दिला. कोणाला डोक्यावर छत्री धरू दिली नाही.भरपावसात केलेल्या त्या भाषणानं सातारकरांचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं. त्यानं मतही वाढली. परिणाम आज सर्वांसमोर आहे.
मात्र, लगेचच त्यांनी आपली मूळ भाषणशैली पुन्हा अंगीकारली. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी उभी करतानाही अनेक हितचिंतकांनी त्यांना, असं जमणार नाही, करू नका, असं खासगीत आणि जाहीरपणे सांगण्याचा प्रयत्न केला. मनापासून सल्ले दिले. पण, त्यांनी ते ऐकले नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रात आज एक नवा राजकिय प्रयोग आकाराला आला आहे. कदाचित तो उद्या देशाच्या राजकिय परिस्थितीलाही नवं वळण देऊ शकेल, असे सुप्रिया सुळे यांनी लेखात म्हटले आहे.
श्री. पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आक्रमक शैलीत भाजपला उत्तर दिले होते. असल्या पैलवानांशी आपण कुस्ती करत नसल्याचे त्यांनी हातवारे करून सांगितले होते. तसेच इतकी वर्षे काय करीत होता, असा सवाल विकास कामांसाठी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांना विचारला होता. तसेच इंदापूरच्या एका सभेत दमबाजी करणाऱ्या विरोधकांचे तंगडे काढून हातात देईन, असा इशारा दिला होता.