मंडल आयोगावर पवारांनी मौन सोडावे : ॲड. शशिकांत पवार - Pawar should break silence on Mandal Commission: Adv. Shashikant Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मंडल आयोगावर पवारांनी मौन सोडावे : ॲड. शशिकांत पवार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

ॲड. पवार म्हणाले, "गेल्या 50 वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रश्‍नावर अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत मी काम करत आहे. सुरवातीला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, ही महासंघाची भूमिका त्यावेळच्या अधिवेशनात मांडली होती. त्यानंतर मंडल आयोग आला. या आयोगामुळे सर्व अडचण निर्माण झाली. या आयोगातून मराठा समाजाला बाजूला ठेवले गेले.

सातारा : मराठा समाजाला मंडल आयोगातून बाजूला ठेवले. त्यामुळे आयोगाला मराठा महासंघाने विरोध केला. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी महासंघाला साथ दिली; पण शरद पवार हे आयोगाच्या बाजूने राहिले. या आयोगातून त्यांनी मराठा समाजाला बाजूला का ठेवले याबाबतची भूमिका मांडावी, असे आवाहन मराठा महासंघाचे ऍड. शशिकांत पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

आरक्षणाच्या प्रश्‍नावर सकल मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी शरद
पवारांसह इतर नेत्यांनी पुढाकार घ्येण्याची गरज आहे. उदयनराजेंनीही नेतृत्व स्वीकारून साताऱ्यापुरते सीमित न राहता महाराष्ट्राबाहेरील लोकांना एकत्र आणावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या येथील "जलमंदिर' या निवासस्थानी ऍड. पवार यांनी भेट घेतली. या वेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर श्री. पवार व उदयनराजे यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला.

ॲड. पवार म्हणाले, ""गेल्या 50 वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रश्‍नावर अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत मी काम करत आहे. सुरवातीला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, ही महासंघाची भूमिका त्यावेळच्या अधिवेशनात मांडली होती. त्यानंतर मंडल आयोग आला. या आयोगामुळे सर्व अडचण निर्माण झाली. या आयोगातून मराठा समाजाला बाजूला ठेवले गेले.

त्या वेळी आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी आम्हाला साथ दिली व आयोगाला विरोध केला; पण शरद पवार हे आयोगाच्या बाजूने राहिले. या आयोगातून मराठा समाजाला बाजूला का ठेवले गेले याबाबतची भूमिका त्यांनी मांडली नाही. आजही या प्रश्‍नावर ते काहीच बोलत नाहीत.'' आरक्षणाच्या प्रश्‍नावर सकल मराठा समाजाला एकत्र केले पाहिजे. त्यासाठी शरद पवारांसह इतर नेत्यांनी पुढाकार घ्यावा. उदयनराजेंनीही नेतृत्व करावे, असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री झाल्यानंतरही शरद पवार हे मंडल आयोगावर बोलायला तयार नव्हते. त्या वेळी त्यांनी निर्णय घेतला असता तर आज चित्र वेगळे असते. त्या वेळी सर्व काही पवार यांच्याच हातात होते, मात्र, त्यांनी काहीही केले नाही. 

- ॲड. शशिकांत पवार, मराठा महासंघ 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख