'महाविकास'च्या घटक पक्षांतील समन्वयाचीच विरोधकांना चिंता : जयंत पाटील  - Opposition worries about coordination among constituents of 'Mahavikas' says NCP State President Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

'महाविकास'च्या घटक पक्षांतील समन्वयाचीच विरोधकांना चिंता : जयंत पाटील 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

मात्र कोरोनामुळे सर्व बाजूचे उत्पन्न थंडावले आहे. अशा परिस्थितीतही राज्याने कोरोनाचा अत्यंत चांगल्या पध्दतीने मुकाबला केला. चांगले काम करत असतानाही विरोधकांनी जाणीवपुर्वक सरकारवर टीका केली. या टीकेकडे दुर्लक्ष करत, त्याने न विचलित होता महविकास आघाडीचे काम अत्यंत दमदारपणे सुरु आहे. 

सातारा : राज्याचा कारभार महविकास आघाडीच्या माध्यमातून अतिशय उत्तम आणि पारदर्शकपणे सुरू आहे. महाविकास आघाडीचे घटक असणाऱ्या सर्व पक्षांत समन्वय असल्यानेच विरोधक चिंतेत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वजण बोलत आहेत. त्याचा त्यांना फार त्रास होत असल्याने मी आणखी त्यांच्यावर बोलून त्रास देणार नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
 
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज श्री. पाटील साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आले होते. अलिकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मवाळ भूमिका घेतल्याबाबत विचारले असता श्री. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचा कारभार अत्यंत समन्वय ठेवून सुरु आहे.

राज्यात सत्तेत आल्यानंतर महापुर, अवकाळी पाऊस, वादळ आणि कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीचा सामना सरकारला करावा लागला. लॉकडाउनमुळे सरकारी तिजोरीवर ताण आला असतानाही अडचणीत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने सुमारे दहा हजार कोटींची मदत दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प अतिशय चांगला आहे.

मात्र कोरोनामुळे सर्व बाजूचे उत्पन्न थंडावले आहे. अशा परिस्थितीतही राज्याने कोरोनाचा अत्यंत चांगल्या पध्दतीने मुकाबला केला. चांगले काम करत असतानाही विरोधकांनी जाणीवपुर्वक सरकारवर टीका केली. या टीकेकडे दुर्लक्ष करत, त्याने न विचलित होता महविकास आघाडीचे काम अत्यंत दमदारपणे सुरु आहे. 

सरकार बहुमतात आहे आणि ते लोकशाहीचे सर्व संकेत पाळून कार्यरत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा प्रश्‍नच नसल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पाटील यांनी टिका केली. सरकार अडचणीत आहे, ते पडेल अशी हाकाटी काही जण मारत आहेत, मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.   महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत. त्यांच्यावर कोणाचेही पाच पैसे बुडविल्याचा आरोप नाही. त्यामुळे या निवडणूकीत तेच बाजी मारतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख