`अजितदादांना प्रसंगी बारामतीत जाऊन प्रत्युत्तर देऊ` - Nilesh Rane targeted Deputy Chief Minister Ajit Pawar. | Politics Marathi News - Sarkarnama

`अजितदादांना प्रसंगी बारामतीत जाऊन प्रत्युत्तर देऊ`

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा घडलेल्या गोष्टींपैकी काही बाहेर काढल्या, तर बारामतीत तोंड वर काढता येणार नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

रत्नागिरी : सध्या कोणीही उठतो आणि राणेंवर टीका करतो. त्यात अजित पवारांची भर पडली आहे. अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले. त्याबद्दल बोलायला नकोच. पहाटे शपथविधीला येणारा माणूस, आज भाजपवर टीका करतो, ती आपण सहन करणार नाही, प्रसंगी बारामतीत जाऊन प्रत्युत्तर देऊ, असा इशारा देत माजी खासदार भाजप प्रदेश सचिव नीलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

प्रदेश सचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणेंनी रत्नागिरीतील सत्कार कार्यक्रमप्रसंगी राणे कुटुंबावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, चार वेळा पराभूत झाले म्हणून राणेंना अनेकजण लक्ष्य करत आहेत. ते सर्वांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामध्ये अजितदादा पवारही आहेत. कोणीही उठतो आणि राणेंवर बोलतो, त्यांना आम्ही का सहन करायचे? हेच अजित पवार पहाटेला शपथविधीसाठी आले, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवारांसोबत उभे केले जाते, आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघूनही गेले. तिकडे गेल्यावर पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळालेय. ते शांतपणे उपभोगायचे सोडून आमच्यावर कसली टीका करता. वेळ पडली तर बारामतीत जाऊन प्रत्युत्तर देऊ. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा घडलेल्या गोष्टींपैकी काही बाहेर काढल्या, तर बारामतीत तोंड वर काढता येणार नाही.

पंधरा वर्षांत पर्यटनासाठी केले काय? 
रत्नागिरीत झालेल्या पर्यटन परिषदेच्या कार्यक्रमाला भेट दिल्यानंतर स्थानिक आमदारांना पर्यटन जिल्ह्यात पोफावले पाहिजे, याची उपरती झाली. गेली पंधरा वर्षे त्यांनी पर्यटनासाठी काय केले, हा प्रश्‍नच आहे. त्यांनी फक्‍त चुना लावण्याचे काम केले, अशा शब्दात नीलेश राणे यांनी टीका केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख