मायणी (ता. खटाव) : सत्तेत किंवा मंत्रिपदावर नसलो तरी येत्या चार - पाच महिन्यात जिहे-कठापूर योजनेचे पाणी कोणत्याही परिस्थितीत माण- खटावला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन माजी पालकमंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दिले.
खटाव-माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड पडळ (ता. खटाव) या साखर कारखान्यास श्री. शिवतारे यांनी सदिच्छा भेट दिली . त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर घार्गे, उपाध्यक्ष मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक विक्रम घोरपडे, महेश घार्गे, अशोक नलावडे, प्रशासकीय अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते.
श्री. शिवतारे म्हणाले, पडळ कारखान्यात येण्यापूर्वी सातारा येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उर्वरीत कामाची माहिती घेतली. पूर्वीप्रमाणे मंत्री पदावर नसलो तरी सत्ताधारी पक्षात असल्यामुळे हे काम पूर्ण करणे हे माझे उद्दिष्ट आहे. येत्या चार ते पाच महिन्यात जिहे-कठापूर योजनेतून कोणत्याही परिस्थितीत नेर तलावात पाणी आणणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
नेर ते आंधळी या सतराशे मीटरच्या बोगद्याचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठीही प्रयत्नशील असून लवकरच माण तालुक्यात देखील जिहे-कठापूर योजनेचे पाणी खळाळणार आहे. ते पुढे म्हणाले, नेवासा तालुक्यात उसाचे भरपूर प्रमाणात क्षेत्र आहे. त्यामुळे तेथे नवीन साखर कारखाना सुरू करण्याचा आपला मानस आहे.
पडळ येथील कारखाना अनंत अडचणींना तोंड देत अल्पावधीतच राज्यात अव्वलस्थानी पोचला आहे. म्हणूनच या सर्व मंडळींसोबत चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले. माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, विजय बापू शिवतारे मंत्रीपदावर असताना या योजनेच्या संदर्भात माझ्याशी ते सातत्याने संपर्कात होते. त्यांनी यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते.

