उदयनराजेंनी केली सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड - MP Udayanraje makes Diwali sweet for Satara Municipal Corporation employees | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंनी केली सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

उदयनराजे भोसले म्हणाले, "आमचे वडील प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज हे या नगरीचे प्रथम नागरिक होते. त्याही पूर्वीपासून सातारा नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आमच्या परिवाराचे सदस्य आहेत, असे आम्ही समजतो. सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी आमचे ऋणानुबंधाचे संबंध असून, ते कधीही संपणारे नाहीत.

सातारा : कोरोना काळातील यंदाची दिवाळी सातारा पालिका कर्मचाऱ्यांना गोड जावी, यासाठी या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 16 हजार आणि कोरोना प्रोत्साहन भत्ता म्हणून एक हजार असे एकूण 17 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. याबाबत नगराध्यक्षा माधवी कदम यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचना केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असून येत्या तीन दिवसांत या रकमेचे कर्मचाऱ्यांना वितरण जाणार आहे. 

यासंदर्भात उदयनराजे भोसले म्हणाले, "आमचे वडील प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज हे या नगरीचे प्रथम नागरिक होते. त्याही पूर्वीपासून सातारा नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आमच्या परिवाराचे सदस्य आहेत, असे आम्ही समजतो. सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी आमचे ऋणानुबंधाचे संबंध असून, ते कधीही संपणारे नाहीत.

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सुख-दु:खात आम्ही नेहमीच सहभागी असतो. यंदाची कोरोना काळातील दिवाळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना गोड जावी म्हणून सातारा म्युनिसिपल कामगार युनियन, लाल बावटाचे अध्यक्ष ॲड. धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष श्रीरंग घाडगे आदींच्या बरोबर चार दिवसांपूर्वीच आम्ही चर्चा केली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे.

जिल्ह्यातील एकूण मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांवर सातारा पालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार केले आहेत. सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्राचे निर्जंतुकीकरण, शहर आणि पेठांमध्ये केलेली औषध फवारणी, सार्वजनिक स्वच्छता, लॉकडाउनच्या काळात ऐन उन्हाळ्यात केलेला अखंडित आणि पुरेसा पाणीपुरवठा, दैनंदिन नागरी सुविधा बंदच्या काळातही सुरूच होत्या.'' सातारा पालिकेचे कर्मचारी विशेषकरून चतुर्थश्रेणी कर्मचारी हे नेहमीच आपल्या नागरिकांच्या हिताकरिता अहोरात्र कष्ट घेत आहेत.

त्यांच्या कर्तव्य भावनेला आमचा सलाम आहे. याच भावनेतून पालिकेची आर्थिक स्थिती कोरोनामुळे समस्येच्या गर्तेत असली तरी देखील  कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या स्नेहभावामुळे आम्ही दिवाळीचे सानुग्रह अनुदान रुपये 16 हजार प्रत्येकी देण्याबाबत संघटनेशी चर्चा केली आहे. कोरोना प्रोत्साहन म्हणून रुपये एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. असे मिळून प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर एकूण रुपये 17 हजार दिले जाणार आहेत. त्याप्रमाणे येत्या दोन दिवसांत या रकमेचे वितरण करण्यात येईल, असेही उदयनराजे यांनी नमूद केले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख