ग्रामविकासच्या कामात एकजूट दाखवा; उदयनराजेंनी केले बिनविरोध ग्रामपंचायतींचे अभिनंदन - MP Udayanraje congratulated the Gram Panchayat without any opposition | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामविकासच्या कामात एकजूट दाखवा; उदयनराजेंनी केले बिनविरोध ग्रामपंचायतींचे अभिनंदन

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 6 जानेवारी 2021

लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी एकमेकांशी संवाद साधला तर त्यातून गावचा सर्वांगीण विकास नक्कीच होईल. गावांचा सर्वांगीण विकास आणि ग्रामस्थांमध्ये समाधान निर्माण करणे हे ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींच्या हाती आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य समजून गावासाठी काम केलं पाहिजे. 

सातारा : आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या सर्व गावांतील ग्रामस्थांनी घेतलेल्या उस्फुर्त निर्णयावर आम्ही मनस्वी आनंदी आहोत. तसेच सर्वांचे खूप खूप अभिनंदन. हीच एकजूट ग्रामविकासाच्या कामात पुढेही आपण सर्व दाखवाल, अशी अपेक्षा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. तसेच आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत, असेही स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी  केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील तब्बल १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच ९८ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या. या ग्रामपंचायतींचे अभिनंदन करून उदयनराजे भोसले यांनी या सर्व ग्रामपंचायतींसाठी शासनस्तरावर जास्तीत जास्त निधी खेचून आणत गावचा सर्वसमावेशक विकास केला जाईल, असा विश्वास दिला आहे. 

उदयनराजे म्हणाले, ग्रामस्थांनी घेतलेल्या उस्फुर्त निर्णयावर आम्ही मनस्वी आनंदी आहोत तसेच सर्वांचे खूप खूप अभिनंदन. हीच एकजूट ग्रामविकासाच्या कामात पुढेही आपण सर्व दाखवाल अशी आम्हास खात्री आहे आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा देऊन मोठ्या प्रमाणात विकास केला गेला पाहिजे. ग्रामीण जनतेला विकासाच्या मार्गावर आणण्याचे प्रयत्न या माध्यमातून केले जातील.

गावांच्या विकासासाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात पण सर्वसामान्यांचा सहभाग आणि सहकार्याने त्या राबवल्या गेल्या तर आवश्यक बदल घडून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी एकमेकांशी संवाद साधला तर त्यातून गावचा सर्वांगीण विकास नक्कीच होईल. गावांचा सर्वांगीण विकास आणि ग्रामस्थांमध्ये समाधान निर्माण करणे हे ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींच्या हाती आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य समजून गावासाठी काम केलं पाहिजे. 

एकजुटीने निर्धार केल्यास गावचा कायापालट...
बदलत्या युगात ग्रामस्थांनी पण आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपल्या गावात विकासाचा पॅटर्न राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्वांनी एकजुटीने निर्धार केल्यास गावचा कायापालट नक्कीच होऊ शकतो, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख