सातारा : सातारा शहरातील पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले रस्ते वाहतूकीसाठी खुले करणे अत्यावश्यक आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम ज्यावेळी घ्यायचा असेल त्यावेळी घ्या. ज्यांच्या हस्ते घ्यायचा असेल त्यांच्या हस्ते घ्या. मात्र, त्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांची कुचंबना करु नका. येत्या आठवडाभरात ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरु करा अन्यथा स्वत: बॅरेकेटस काढून वाहतूक सुरु करु, असा इशारा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला आहे.
शिवेंद्रसिंहराजे यांनी यासंदर्भात जिल्ह प्रशासनास दिलेल्या पत्रकात म्हटले की, सातार्यातील सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामुळे सातारा शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. बांधकाम विभागाकडून ग्रेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरु आहे.
केवळ आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण करुन चालणार नाही. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ग्रेड सेपरेटर वाहतूकीसाठी तात्काळ खुला करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीला ग्रेड सेपरेटर म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. पोवईनाका हे शहराचे मुख्य ठिकाण आहे.
सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि बाजारपेठा सुरु झाल्याने सातारा शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत आहे. ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरु नसल्याने या रस्त्यांवर वाहतूकीचा ताण पडत आहे. गेले कित्येक वर्षांपासून ग्रेड सेपरेटरची फक्त चर्चा सुरु आहे. प्रत्यक्ष वाहतूकीसाठी कधी खुला होणार असा प्रश्न नागरीक करू लागले आहेत.
केवळ उद्घाटनासाठी ग्रेड सेपरेटर खुला न करणे हे अनाकलनीय कोडे आहे. याचे उदघाटन जेव्हा करायचे असेल तेव्हा सवडीने आणि आवडीने करा पण, त्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय करु नका. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निर्णय घेऊन येत्या आठ दिवसांत ग्रेड सेपरेटरमधील काम पूर्ण झालेले मार्ग खुले करावेत. अन्यथा, लोकहितासाठी मला स्वत: ग्रेड सेपरेटरला लावलेले बॅरेकेटस काढून रस्ता सुरु करण्याचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे.

