राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात आशिष शेलार काय रणनीती आखणार? - MLA Ashish Shelar to decide Satara Zilla Parishad election strategy | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात आशिष शेलार काय रणनीती आखणार?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 जुलै 2021

सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात थांबून तेथील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.

सातारा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जिल्हानिहाय तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांचे प्रमुख नेते आता जिल्ह्यात जाऊन तेथील तयारीचा आढावा घेत आहेत.  भाजपचे नेते आमदार आशिष शेलार आता सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्याची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनिती ठरविणार आहेत. त्यासाठीचा आढावा घेण्यासाठी उद्या (रविवारी) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते येत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने सातारा जिल्ह्यात बुथ बांधणीवर भर दिला आहे. (MLA Ashish Shelar to decide Satara Zilla Parishad election strategy)

आशिष शेलार यांना मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महत्वाची जबाबदारी न देता त्यांना राज्याच्या इतर भागांत फिरण्यास सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने त्यांनी गेल्या महिन्यात त्यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला होता. आता ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. पण, सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीतही महाविकास आघाडी हवी आहे. तर भाजपने स्वबळावर पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्हा परिषदेत यापूर्वी भाजप व शिवसेनेचा एकही सदस्य नव्हता. पण, मागील निवडणुकीत भाजपचे सात, तर शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले आहेत.

हेही वाचा : मुंडे समर्थक आक्रमक : ZP, पंचायत समिती सदस्यांसह १४ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

त्यामुळे भाजप व शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रवेश केला आहे. आता त्यांचा सदस्यसंख्या वाढविण्याचा अजेंडा आहे. त्यासाठी भाजपचे दोन आमदार व दोन खासदारांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत ताकद निर्माण करण्याची तयारी भाजपची आहे. त्यानुसार भाजपने बूथनिहाय बांधणी सुरू केली आहे. यामध्ये बूथरचना करताना यापूर्वी सक्षम कार्यकर्त्यांना पुन्हा संधी देण्यासोबत ज्यांचे काम चांगले नाही, त्यांना बदलले जाणार आहे.

आवश्य वाचा : येतोय नवीन कायदा...हम दो, हमारे दो अन्यथा सरकारी नोकरीसह निवडणूक लढण्यासही मुकाल!

यातून बूथ सक्षमीकरण करून आगामी निवडणुका सोप्या करण्यावर भर राहणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार उद्या (रविवारी) साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात थांबून तेथील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.

यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसह नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेऊन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही कानमंत्र देणार आहेत. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. त्यासाठी त्यांनी बूथबांधणी सुरू केली आहे. यामध्ये सक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने बूथबांधणीवर भर दिला आहे. आम्ही या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर व स्वबळावर लढणार आहोत. उद्या (रविवारी) आमदार आशिष शेलार साताऱ्यात येऊन आगामी निवडणुकीसाठीची रणनीती सांगणार आहेत.
-विक्रम पावसकर  (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख