कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात झालेले मनोमिलन जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. काका व आमच्यामध्ये मनभेद नव्हते मतभेद होते. ते विसरून ॲड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून टाकलेले पाऊल महत्वाचे आहे असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आमदार चव्हाण म्हणाले, काँग्रेसची जुळणी करणे ही काळाची गरज आहे. प्रतिसरकार स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ही अवस्था होणे वाईट आहे. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र, त्या खोलात न जात काँग्रेसला जुने दिवस आणण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू.
अवघड वाटत असलेतरी अजूनही स्थिती अटोक्यात येऊ शकते. त्यामुळे आजचे मनोमिलन जिल्ह्यातील राजकीय दिशा बदल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरवात कऱ्हाड तालुक्यातून झाली आहे. निवडणूक झाल्यानंतर उदयसिंह पाटीलांची भेट झाली. त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते विलासकाकांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी घरी गेलो. तेथे चर्चा झाली तेव्हा काकांनी माझ्या घरातील एकही व्यक्ती जातीवादी पक्षात जाणार नाही. आमच्या घराला स्वातंत्र्यसैनिकांची पंरपरा आहे, असा विश्वास दिला.
त्यातून त्यांचे आर्शीवाद घेत मनोमिलनाची पाऊले पडली. मागच्या काही गोष्टी झाल्या असतील मात्र, त्या सर्व गोष्टी विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोराताची भेट घेतली. त्यांना कऱ्हाडला येण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये मनोमिलनाची नांदी येथे होत आहे. हे मनोमिलन जिल्ह्याला दिशा देणारे असेल. जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदल्याशिवाय रहाणार नाही.
श्री. चव्हाण म्हणाले, केंद्रामध्ये मोदी व शहा ही जोड गोळी आहे. त्यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला. तो लोकशाहीला गिळकृंत करणारा आहे. तोच आदर्श घेत राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ता असताना काम केले. सत्तेत असताना साम, दाम,दंड, भेद व भिती दाखवून 40 पेक्षा जास्त नेते भाजपात घेतले.
मात्र, निवडणूकीनंतर परिस्थिती बदलली आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आली. आता त्यांचा व्यवस्थित सुरू आहे. ही सत्ता आणण्यात माझाही खारीचा वाटा आहे. भाजप नसेल तरी चालणार हा शिरस्ता मोडीत काढला आहे. आता केंद्राची वेळ आली आहे. बहुजनांचे सरकार आणण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले आहे. त्यास जरूर यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

