महाविकास आघाडीची राज्यात दडपशाही; जातीजातीत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न - Mahavikas Aghadi repression in the state says Ranjitsinha Mohite patil | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीची राज्यात दडपशाही; जातीजातीत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

राज्यात कोरोना सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून गैरव्यवहार करणारांना सरकार पाठीशी घालत आहे. तसेच महाविकास आघाडीने सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असल्याची केवळ घोषणा केली असून प्रत्यक्षात 18 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत

सातारा : भाजप सरकार सत्तेत असताना जनतेच्या हिताचे निर्णय घेतले होते. या निर्णयांना स्थगिती देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याची टीका आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज येथे केली. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात दडपशाही करत जातीजातीत दरी निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

महाविकास आघाडीला सत्तेत येऊन वर्षपूर्ती झाल्याने तीनही पक्षांचा कारभार मांडण्यासाठी मोहिते- पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते. सध्या देशभरात कोरोनाचे संकट उभे ठाकले असून या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य केले आहे.

मात्र, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले, असे स्पष्ट करून ते म्हणाले, "राज्यात कोरोना सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून गैरव्यवहार करणारांना सरकार पाठीशी घालत आहे. तसेच महाविकास आघाडीने सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असल्याची केवळ घोषणा केली असून प्रत्यक्षात 18 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.'' 

मराठा आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी उदासीन आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. भाजप सरकार सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, सध्या सरकारची आरक्षणाबाबत भूमिका पाहता महाविकास आघाडी ही मराठा आरक्षणाच्या विरोधी असल्याचे सांगत श्री. पाटील यांनी या आघाडीवर जोरदार टीका केली. 

फलकावर खासदार, आमदारांचे फोटो नव्हते...

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने लावलेल्या फलकावर काही ठराविक लोकांचे फोटो होते. त्यावेळी जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभेचे खासदार व आमदारांचा फोटो नसल्याबाबत पत्रकारांनी जिल्हाध्यक्ष पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी आमदार भोसलेंकडे पाहत त्यांनी पुढील वेळी नक्की दक्षता घेऊ, असे सांगत प्रश्‍नाला बगल दिली. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख