बोट मोडून महाविकास आघाडीचे सरकार बदलणार नाही : पृथ्वीराज चव्हाण

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक महत्त्वाचे खटले प्रलंबित आहेत. पण हे खटले पुढे सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळ नाही. याचा अर्थ सध्या देशात लोकशाही अस्तित्वातच नाही. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकारने व नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काही काम होत असल्याचे दिसते.
Congress Leader Prithviraj Chavan
Congress Leader Prithviraj Chavan

वाई : पाच वर्षाच्या त्यांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली होती, म्हणून आम्ही हे सरकार स्थापन केलं आहे. चांगलं काम करणारे हे भक्कम सरकार आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून महाविकास आघाडीचे सरकार बदलत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण वाई येथे आले होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, डी. एम. बावळेकर, विराज शिंदे उपस्थित होते.

अर्णब गोस्वामी अथवा कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने सरकारला कोणताही दोष दिलेला नाही. या निकालाचा अभ्यास सुरू आहे, जर काहीही चुकीचे वाटले तर त्याबाबत अपील करता येईल. न्यायालयाने या खटल्यात दिलेल्या निवाड्याबाबत आम्ही काही बोलणार नाही. मात्र, अत्यंत महत्त्वाची प्रकरणे सुनावणीला येणे गरजेचे असताना व 35 हजारपेक्षा जास्त महत्वाचे खटले सुनावणीसाठी प्रलंबित असताना न्यायालयाने राजकीय दृष्ट्या सोयीचे खटले सुनावणीला घेतले. त्याला आमची हरकत आहे. 

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक महत्त्वाचे खटले प्रलंबित आहेत. पण हे खटले पुढे सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळ नाही. याचा अर्थ सध्या देशात लोकशाही अस्तित्वातच नाही. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकारने व नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काही काम होत असल्याचे दिसते. त्यामुळे सामान्य लोकांना घटनेत अभिप्रेत असणारा न्याय मिळणार की नाही अशी शंका लोकांत निर्माण होत आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. या सरकारने वर्षभरात चांगलं काम केलं आहे. कोविडवर नियंत्रण चांगल्याप्रकारे आणले आहे. कोविडचे मोठे संकट असताना ही अनेक निर्णय, शेतकरी कर्ज, अवकाळी पाऊस, आदी अनेक विषय थांबलेले नाहीत. विरोधक केवळ व्देषातून आणि विद्वेगातून आरोप करत आहेत आणि हे आरोप कोणीही गांभीर्याने घेत नाही.

महाविकास आघाडीचे सरकार हे भक्कम व चांगले चालणारे सरकार आहे आणि हे पाच वर्षे पूर्ण करेल. चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांत जुगलबंदी एक करमणूक आहे. यापेक्षा त्याला महत्व नाही. मागच्या सरकारने राज्यात कोणताही मोठा प्रकल्प उभारला नाही. शेतकरी आत्महत्या याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

महाराष्ट्र व्यापार सर्वेक्षण मूल्यांकनात घसरून सहा क्रमांकावरून तेरा क्रमांकावर घसरल्यामुळे उद्योगधंदे बाहेर जायला लागले होते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी राहणार की नाही असा प्रश्न निर्माण होऊन हे स्थान दिल्लीकडे सरकायला लागलेले होते. पुन्हा जर हे सरकार राज्यात आले असते तर देशात महाराष्ट्र राहिला नसता म्हणून आम्हाला हे सरकार स्थापन करावे लागले, असे सांगून चव्हाण म्हणाले सरकारचे मूल्यमापन करायला राज्यातील जनता समर्थ आहे .  


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com