पिंपरी : ईडीचा पायगुणच लई भारी.ईडीची नोटीस आली की चांगलंच हुतंय. आम्हाला (राष्ट्रवादीला,शरद पवारांना) ईडीची नोटीस आली आणि हवाच बदलली. आमचा पक्ष संपला म्हणत होते आणि आम्ही या नोटीशीनंतर थेट सत्तेतच आलो. आता शिवसेनेला (ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक) ही नोटीस आलीय. त्यांचा मुख्यमंत्री, तर आहेच. बघू त्यांना आणखी काय मिळतंय आता? असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) येथे केले आणि उपस्थितांत हशा पिकला.
ईडीची नोटीस आणि नंतरचा पाऊस या दोन गोष्टी आमच्या दृष्टीने चांगल्याच घडल्या. कारण नोटीसीने सत्ता आली आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाने उजनीसह सगळी थरणं तुडुंब भरली, असे सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडी सरकारला आजच एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्षेही कधी होतील हे कळणारही नाही, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरनाईकांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर खुमासदार भाष्य केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यावरही (सिरम इन्स्टिट्यूट भेट) असेच उपरोधिक वक्तव्य करताना त्या म्हणाल्या, पुरा दुनिया घूम लो, लेकिन पूना के आगे कुछ नही है! सारी दुनिया फिरा, पण लस पुण्यातच सापडणार. नाही, तर कोणीतरी म्हणायचं लस मीच शोधलीय.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार मेळाव्यात सुळे बोलत होत्या. त्यांचं आजचं भाषण अतिशय खुमासदार झालं. माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनिल शेळके, संजय जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, एसआरपी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, आदी उपस्थित होते.

