सोलापूर : महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पक्षाच्या ताकतीची भीती वाटत असल्याने तीन विभिन्न विचाराच्या पक्षांना इच्छा
नसतानाही एकत्र राहावंच लागत आहे. मात्र, आम्ही तर सरकारमध्ये येणारच आहोत. फक्त कधी ते सांगणार नाही. आता डायरेक्ट कृतीच करणार, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदांच्या निवडणूकीच्या निकालात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाहीये, असे सांगून श्री. दरेकर म्हणाले, महाविकास आघाडीने यामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नये. आणखी खूप निवडणूका बाकी आहेत. विधान परिषदेची निवडणूक ही एक छोटीशी चकमक होती.
आणखी महत्वाची लढाई बाकी आहे.
राज्यातील जनतेने कौल दिलेला आपण पाहिलेला आहे. नुकतंच हैद्राबाद महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने चार जागा असणाऱ्या भाजपला दहापट जास्त कौल दिला आहे. आता भाजप विधान परिषदेच्या निवडणूक निकालांचे आत्मपरीक्षण करून येणाऱ्या काळात समोर जाईल, असे ही श्री. दरेकर यांनी स्पष्ट केले.
निवडणुक जरी एकत्र झाली, तरी पुढे काय होतय ते पहा, असे सांगून श्री. दरेकर म्हणाले, वीज बिलमाफीचा प्रस्ताव संजय राऊत पाठवितात, पण तो मंजूर केला जात नाही. त्याचवेळी एसटीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज मंत्री अनिल परब मिळवतात. तीन पक्षांसह पक्षांतर्गत ही कुरघोड्या आहेत.
अशोक चव्हाण म्हणतात की नितीन राऊतांनी प्रोसेसच पूर्ण केलेली नाही. बाळासाहेब थोरात म्हणतात नाही, आमची चर्चा झाली होती. अशा प्रकारे पूर्ण विसंवादाने भरलेले हे सरकार आहे. भारतीय जनता पक्षाची त्यांना एवढी भिती आहे, त्यांना इच्छा नसताना एकत्र राहावं लागत आहे, असेही श्री. दरेकर यांनी नमुद केले.

