ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीत मनसेची उडी - Maharashtra Navnirman Sena Will face Grampanchayat Election | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीत मनसेची उडी

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 डिसेंबर 2020

ज्या उमेदवारांना मनसेकडून उमेदवारी दिली आहे, त्यांच नाव, गाव, पत्ता, मोबाईलक्रमांक वॉर्डनिहाय यादी पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयाकडे इमेल व्दारे पाठवावी, अशी सूचना श्री. नांदगांवकर यांनी केली आहे. त्यामुळे भाजप, महाविकास आघाडीसोबतच आता ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीत मनसेही उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सातारा : लोकसभेची निवडणूक लढली नाही, विधानसभेच्या निवडणूकीत अल्प यश आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील सर्व ग्रामपंचायतीत उमेदवार उभे करावेत व त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावेत, अशी सूचना मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी कार्यकर्त्यांना लेखी पत्राव्दारे केली आहे. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका आता डिसेंबर, जानेवारीत होत आहेत. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवरील गटतटातच होते.

मात्र, सध्याची राजकिय परिस्थिती लक्षात घेता भाजपसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही ग्रामपंचायत निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढाव्यात अशी सूचना केली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या गेल्या आहेत.

त्यामुळे यावेळेस पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गटतटातच ग्रामपंचायत निवडणूक गाजणार आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे. यासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बाळा नांदगांवकर यांनी याबाबतचे पत्र स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठविले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले की, येत्या २३ डिसेंबरपासून राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांसाठी उमेदवार अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये आपले उमेदवार उभे करावेत. तसेच त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावे.

तसेच ज्या उमेदवारांना मनसेकडून उमेदवारी दिली आहे, त्यांच नाव, गाव, पत्ता, मोबाईलक्रमांक वॉर्डनिहाय यादी पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयाकडे इमेल व्दारे पाठवावी, अशी सूचना श्री. नांदगांवकर यांनी केली आहे. त्यामुळे भाजप, महाविकास आघाडीसोबतच आता ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीत मनसेही उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

  
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख