कोल्हापूरमध्ये मनपा निवडणुकीची तयारी सुरू; राष्ट्रवादीचे ३० जागांचे लक्ष - Kolhapur Municipal Corporation Election Preparations Started | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूरमध्ये मनपा निवडणुकीची तयारी सुरू; राष्ट्रवादीचे ३० जागांचे लक्ष

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

आगामी निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी तसेच शिवसेना स्वतंत्रपणे लढणार हे निश्‍चित आहे. निकालानंतर तिघेही एकत्रित येतील. भाजप ताराराणी आघाडी कायम राहिल. शिवसेनेपुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते चारही जागा टिकवून ठेवण्याचे

कोल्हापूर :  महापालिका निवडणुकीस अद्याप चार ते पाच महिन्यांचा अवघी असला तरी राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोअर कमिटीची स्थापना करून एक पाऊल पुढे टाकले आहे. पक्षाचे नेते तसेच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ३० जागांचे लक्ष्य समितीसमोर ठेलल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस.भाजप ताराराणी आघाडी, शिवसेनेच्या स्तरावरही नियोजन सुरू झाले आहे.

मार्च ते एप्रिलमध्ये निवडणूक होईल अशी शक्‍यता आहे. येत्या पंधरा नोव्हेंबरला विद्यमान सभागृहाची मुदत संपत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला होता. त्याची सुरवात कोल्हापूर महापालिकेत २०१५ लाच झाली. राज्यात त्यावेळी भाजपसोबत शिवसेना असूनही येथील चार सदस्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीला साथ दिली. पुर्वी फॉर्ममध्ये असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस गेल्या निवडणुकीत मात्र अपेक्षेप्रमाणे जागा मिळवू शकली नाही. १५ जागापर्यंत राष्ट्रवादीचे संख्याबळ खाली घसरले. या उलट कॉंग्रेसला कोणी वाली नसताना विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर सर्वाधिक २७ जागा निवडून आणल्या. 

भाजपला महापालिकेच्या राजकारणात पहिल्यांदाच १३ जागा मिळाल्या. महाडिक गटाची ताकद ताराराणी आघाडीला असल्याने या आघाडीने १८ जागा मिळविल्या. कोणत्याही स्थितीत सत्ता मिळविणार असा विडा उचललेल्या भाजप ताराराणी आघाडीला आठ ते दहा जागा सत्तेसाठी कमी पडल्या. राष्ट्रवादीने ऐनवेळी कॉंग्रेसला साथ दिली नसती तर कॉंग्रेसनेही सर्वाधिक जागा जिंकून उपयोग झाला नसता. कॉंग्रेसचे अपक्षांसह २९ सदस्य झाले. राष्ट्रवादीचे १५ सदस्य त्यांना मिळाले. शिवसेनेच्या चार सदस्यांना पाठिंबा दिला त्यामुळे संख्या ४८ वर पोहचली.

आगामी निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी तसेच शिवसेना स्वतंत्रपणे लढणार हे निश्‍चित आहे. निकालानंतर तिघेही एकत्रित येतील. भाजप ताराराणी आघाडी कायम राहिल. शिवसेनेपुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते चारही जागा टिकवून ठेवण्याचे. त्यात जिल्ह्राप्रमुख संजय पवार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यातील मतभेद काही संपतील असे वाटत नाही. त्यामुळे तिकीट वाटपावेळी त्यांची खरी कसोटी लागणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोअर कमिटी स्थापन केली आहे. यात शहराध्यक्ष आर.के. पोवार, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेवक अजित राऊत, उत्तम कोराणे, विनायक फाळके, राजू लाटकर, आदिल फरास यांचा समावेश आहे. पक्षाचे नेते तसेच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तीस जागा निवडून आणण्याचे लक्ष्य या समितीला दिल्याचे समजते. कॉंग्रेसचा विचार करता पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे जागा वाटपाचा निर्णय असणार आहे. उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील त्यांच्या सोबतीला असतील. 

सतेज पाटील यांचा उत्तरपेक्षा दक्षिणमधून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न असेल तर राष्ट्रवादीची भिस्त शहरातून जास्तीत जास्त निवडून येतील याकडे असेल.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, पश्‍तिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदि भाजप ताराराणी आघाडीचे सारथ्य करतील. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांनी जोर बैठकांना आतापासून सुरवात केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख