अंगापूर (ता. सातारा) : चिंचणेर निंब (ता.सातारा) येथील जवान सुजित नवनाथ किर्दत (वय 38) हे सिक्कीम येथे सेवा बजावत असताना हुतात्मा झाले आहेत. गस्तीदरम्यान त्यांचे वाहन दरीत कोसळले आणि त्यात ते हुतात्मा झाले. या अपघातात त्यांचे इतर सहकारी सुध्दा हुतात्मा झाले असून किर्दत यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा ग्रामस्थांना लागून राहिली आहे.
चिंचणेर निंब येथील सुजित किर्दत हे भारतीय सैन्य दलाच्या अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणुक सिक्कीम येथे होती. काल दुपारी किर्दत हे सहकाऱ्यांसमवेत गस्तीवर होते. गस्तीदरम्यान त्याचे वाहन खोल दरीत कोसळले. यात किर्दत यांच्यासह त्यांचे सहकारी जवान हुतात्मा झाले.
अपघातानंतर लष्करी जवानांनी मदत कार्य करत दरीतून हुतात्मा जवानांना बाहेर काढले. अपघातात सुजित किर्दत हे हुतात्मा झाल्याचे समजताच चिंचणेर निंबसह संपुर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली. किर्दत यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी पुणे येथील विमानतळावर येणार आहे. याठिकाणी त्यांना लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे.
यानंतर त्यांचे पार्थिव साताऱ्याकडे आणण्यात येणार आहे. हुतात्मा किर्दत यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. किर्दत हे 2002 मध्ये लष्कराच्या अभियंता रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. दीड महिन्यांपूर्वी सुट्टी संपवून ते पुन्हा सेवेत दाखल झाले होते.
कुटुंबाला सैनिकी परंपरा
शहीद किर्दत यांच्या घराला सैनिकी परंपरा आहे. त्यांचे वडील हे सुध्दा भारतीय लष्करी सेवेतून निवृत्त झाले आहेत. सुजित यांचे थोरले बंधू सुध्दा लष्करात कार्यरत आहेत. एकाच घरातील तीन जण कार्यरत असल्याने किर्दत कुटुंबियाला सैनिकी परंपरा लाभली आहे.

