पुणे पदवीधरसाठी जनता दलाकडून प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी  - Janata Dal's Sharad Patil candidate for Pune graduate | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पुणे पदवीधरसाठी जनता दलाकडून प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी 

भरत पचंगे
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर मतदारसंघ प्रा. पाटील यांना पूर्ण परिचित असून त्यांचा या मतदार संघातील मतदारांवरही उत्तम प्रभाव आहे. या शिवाय भाजपाच्या कुणाही उमेदवाराला पराभूत करु शकतो अशी त्यांची ख्याती असल्याने यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच शिवसेना या पक्षांनी प्रा.पाटील यांच्यासाठी सबुरीची भूमिका घेवून एकास एक अशा पध्दतीने भाजपाच्या उमेदवारला पराभूत करण्यासाठी प्रा. पाटील यांना पाठींबा द्यावा, अशी मागणी नुकत्याच मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आली.

शिक्रापूर : पदवीधर मतदारसंघात प्रकाश जावडेकरांना एकदा धूळ चारणारे विद्यमान प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहिर करुन जनता दलाने (सेक्यूलर) भाजपाला हरवण्यासाठी पाटील यांच्या उमेदवारीला पाठींबा द्या म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आज आवाहन केले.

आज मुंबईत पक्षाची बैठक होऊन त्यात प्रा. पाटील यांची उमेदवारी जाहिर केली व मित्रपक्षांना पाठींब्याचे आवाहन पक्ष महासचिव बी. जी. कोळसे पाटील व प्रमुख नेत्यांनी केले. दरम्यान, महाआघाडीत पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवारीबाबत एकमत होत नसताना जनता दलाने प्रा.पाटील यांची थेट उमेदवारी जाहिर केल्याने महाआघाडीसाठी आता आणखी डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

जनता दलाचे (सेक्यूलर) ज्येष्ठ माजी आमदार प्रा. शरद पाटील हे यापूर्वी मिरज विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेत गेलेत तर २००२ मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून तत्कालीन भाजप उमेदवार व विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सारख्या दिग्गज उमेदवाराला हरवून विधान परिषदेत पोहचले होते.

पुणे पदवीधर मतदारसंघ प्रा. पाटील यांना पूर्ण परिचित असून त्यांचा या मतदार संघातील मतदारांवरही उत्तम प्रभाव आहे. या शिवाय भाजपाच्या कुणाही उमेदवाराला पराभूत करु शकतो अशी त्यांची ख्याती असल्याने यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच शिवसेना या पक्षांनी प्रा.पाटील यांच्यासाठी सबुरीची भूमिका घेवून एकास एक अशा पध्दतीने भाजपाच्या उमेदवारला पराभूत करण्यासाठी प्रा. पाटील यांना पाठींबा द्यावा, अशी मागणी नुकत्याच मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आली.

या शिवाय अन्य पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी असल्याने नाराज इच्छुकांचा फटकाही विद्यमान उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. महाआघाडीतील
कुणाही एका पक्षाच्या उमेदवारावर वरिष्ठ पातळीवर एकमत झाले, तरी इतर पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि मतदार नेमके मतदान करतील याची धास्ती आहेच. पर्यायाने या सर्व घडामोडींचा फायदा भाजपा उठविणार असल्याने महाआघाडीतील सर्व पक्षांनी एकमताने प्रा. पाटील यांचे नावावर शिक्कामोर्तब करुन थेट विजयी गुलाल घेण्यासाठीच यावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. 

बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बी.जी.कोळसे-पाटील, राज्य प्रधान महासचिव प्रताप होगाडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, युवा अध्यक्ष नाथा शेवाळे, कार्याध्यक्ष रेवण भोसले, उपाध्यक्ष डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर वरील नेत्यांच्या सहीसह संयुक्तरित्या प्रसिध्दी पत्रक जारी करुन वरील माहिती पक्षाचे वतीने प्रवक्ते युवा प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तीनही पक्षांकडून या मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे.

त्यातच काँग्रेस शिक्षक मतदारसंघात आपला उमेदवार देऊन पदवीधरमध्ये माघार घेण्याची चिन्हे आहेत. तर पद्वीधरमध्ये पाच तगड्या उमेदवारांची यादी थेट मातोश्रीवर पाठवून पुणे शहर-जिल्हा शिवसेनेने आपले इरादे जाहिर केलेत. याच पार्श्वभूमीवर आता जनता दल (सेक्यूलर) यांनी प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर करुन महाआघाडीच्या डोक्याला शीण वाढविला असल्याने ही निवडणूक महाआघाडीसाठी आव्हानात्मक होण्याच्या दिशेने निघाली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख