उदयनराजेंनी संग्राम देशमुखांना टाळले आणि कोकाटेंना भेटले - Independent Kokate took the blessings of BJP MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंनी संग्राम देशमुखांना टाळले आणि कोकाटेंना भेटले

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

सध्या सातारा जिल्ह्यात पदवीधरच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. भाजपसह महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून दररोज मेळावे, बैठका, मतदारांच्या गाठीभेटी यावर उमेदवारांनी भर दिला आहे. अशातच महाविकास आघाडीचे नेते व भाजपच्या नेत्यांत कलगीतूरे रंगले आहेत. या सर्व परिस्थितीत खासदार उदयनराजे भोसले हे मात्र, अद्याप तरी शांतच आहे.

सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले अद्याप कुठेही प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी भाजपचे पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख हे त्यांची भेट घेण्यासाठी साताऱ्यात आले होते. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. पण काल पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी उदयनराजेंची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी श्री. कोकाटे यांना
निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे पदवीधरच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सध्या सातारा जिल्ह्यात पदवीधरच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. भाजपसह महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून दररोज मेळावे, बैठका, मतदारांच्या गाठीभेटी यावर उमेदवारांनी भर दिला आहे. अशातच महाविकास आघाडीचे नेते व भाजपच्या नेत्यांत कलगीतूरे रंगले आहेत. या सर्व परिस्थितीत खासदार उदयनराजे भोसले हे मात्र, अद्याप तरी शांतच आहे.

सहाजिकच ते भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठीशी असणार आहेत. पण काल पदवीधरचे अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत उदयनराजे अद्यापही प्रचारात दिसत नाहीत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख प्रचार दौऱ्यात साताऱ्यात आले होते. मात्र, उदयनराजे भोसले व त्यांची भेट होऊ शकली नाही. केवळ फोनवरून चर्चा झाली होती.

त्यानंतर आता अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली आहे. या भेटीवेळी उदयनराजे यांनी कोकाटे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ऐकूनच या निवडणुकीत उदयनराजेंची काय भूमिका काय राहणार याबाबत राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख