शासकिय रूग्णालयात मिळणार मोफत रक्त; आरोग्यमंत्री टोपेंसह  सुप्रिया सुळे यांचे रक्तदान - Health Minister Rajesh Tope on Thursday announced that patients from all government hospitals will get free blood. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

शासकिय रूग्णालयात मिळणार मोफत रक्त; आरोग्यमंत्री टोपेंसह  सुप्रिया सुळे यांचे रक्तदान

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

कोरोनामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. यामुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलनात अग्रेसर आहे; मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हा एक पर्याय असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई : राज्यात शनिवारपासून (ता. 12) सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केली. रक्त तुटवड्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज दुपारी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर झाले. यावेळी राजेश टोपे, सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ''शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रक्रियेसाठी 800 रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्त हा घटक किती महत्त्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे 344 ब्लड बॅंक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

कोरोनामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. यामुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलनात अग्रेसर आहे; मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हा एक पर्याय असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर

खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 13 ते 20 डिसेंबरदरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त प्रत्येक तालुक्‍यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख