पदवीधर, 'शिक्षक' च्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला : हसन मुश्रीफ - graduate, teachers Election People beat BJP Says NCP Minister Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधर, 'शिक्षक' च्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला : हसन मुश्रीफ

अनंत पाताडे 
शनिवार, 5 डिसेंबर 2020

निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं. कोरोना संकटात राज्याचं आर्थिक स्त्रोत बंद झालं. तरी राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला वेतन दिलं, याची पोचपावती लोकांनी दिली.

सिंधुदुर्ग : भाजपचा जो उन्माद आणि माज होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला. हे फक्त सरकारचं लक्ष विचलीत करण्याचं काम करत आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

हसन मुश्रीफ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाजगी दौऱ्यावर होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक बघून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला.

भाजपने गेल्या वर्षभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत प्रकरण असेल किंवा ईडी-सीबीआयचा गैरवापर करून आपल्या विचारांचे जे लोक नाहीत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं. कोरोना बाधितांचे आकडे जरी कमी झाले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना चाचण्या कमी झाल्या, असा आरोप करायचे.

 मृत्यू कमी झाले तर म्हणायचे मृत्यू दडवले. हा गेल्या एका वर्षातला थयथयाट पाहून लोकं कंटाळली. त्यामुळेच या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं. कोरोना संकटात राज्याचं आर्थिक स्त्रोत बंद झालं. तरी राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला वेतन दिलं, याची पोचपावती लोकांनी दिली.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख