ढेबेवाडी (ता. पाटण) : कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील नऊ गांवातील प्रकल्पग्रस्तांना अनेक वर्षापासून उदरनिर्वाह भत्ता मिळणे बाकी होते. मागील पंचवार्षिकमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वांग-मराठवाडी प्रकल्पातील नऊ गांवातील प्रकल्पग्रस्तांची दिवाळी गोड झाली आहे. या गावांची उदरनिर्वाहाची सहा कोटी ६० लाख रुपयांची रक्कम लघू पाटबंधारे विभागाकडून वितरीत करण्यात आली आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत वांग मध्यम प्रकल्पात ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमीन पाण्याखाली बुडाल्या आहेत. धरणासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीतील माती उचलण्यात आली आहे. तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप केले नाही. या प्रकल्पग्रस्तांना प्रतिमहा चारशे रूपये या दराने उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप प्रलंबित होते.
या नऊ गांवातील सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांचे उर्वरीत राहिलेले उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप तात्काळ करावे, याकरीता मंत्री देसाई आमदार असताना शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करित होते. त्यांच्या पाठपुराव्याला मंत्री झाल्यानंतर यश आले आहे. सातत्याच्या पाठपुराव्यामुळे शासनाने वांग मध्यमच्या प्रकल्पग्रस्तांना चारशे रूपये प्रतिमहा या दराने उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केले.
त्यानुसार या प्रकल्पातील नऊ गावातील बाधितांना अनुक्रमे उमरकांचन 446, मेंढ 314, घोटील कोतीज 57, घोटील ताईगडेवाडी 228, मराठवाडी 111, जाधववाडी 82, जिंती 131, निगडे 39, मेंढ केकतवाडी 26 अशा एकूण 1434 खातेदारांना सहा कोटी 59 लाख 53 हजार 335 रुपये रक्कमेचे वाटप सातारा लघु पाटबंधारे विभागाकडून दिवाळीपुर्वी करण्यात आले आहे. वांग मराठवाडी प्रकल्पातील बाधित प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्याचा अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न शंभूराज देसाईंच्या विशेष पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे.

