सातारा : कोविड लसीकरणाची पहिल्या टप्प्यातील 'ड्राय रन' आज (शुक्रवार) सकाळी नऊ वाजता पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड व प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ या तीन ठिकाणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
केंद्र शासनाने सिरमच्या कोविडशिल्ड लसीला परवानगी दिली आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी केली आहे. कोरोना लस पूर्णत: सुरक्षितता बाळगून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग, दुसऱ्या टप्प्यात पोलिस, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
कोविड लस देण्यासाठी तीन सेंटर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पहिले सेंटर वेटिंग रुम, दुसरे व्हॅक्सिन, तर तिसरे ऑब्झरर्व्हेशन'चे असणार आहे. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही वेळ थांबून नंतर सोडण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे दररोज सरासरी 50 ते 60 रुग्ण आढळून येत आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 55 हजार रुग्णसंख्या झाली असून, 1 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. याचबरोबर जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. नागरिकांनीही कोविडची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ टेस्ट करण्याची आवश्यकता आहे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबर खासगी लॅबमध्ये रॅप व आरटीपीसीआर टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ कोरोनाची टेस्ट करण्याचे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.

