जनसंघर्ष टाळण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : नानासाहेब पटोले  - Caste wise census necessary to prevent mass conflict says MLAs Speaker Nanasaheb Patole | Politics Marathi News - Sarkarnama

जनसंघर्ष टाळण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : नानासाहेब पटोले 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

श्री. पटोले म्हणाले, विधानसभेच्या अध्यक्षांचा नवीन परिचय माझ्या कामातून करून देणार आहे. लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत माझे अधिकार लोकांसाठी वापरून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राज्यात कोणकोणते उपक्रम राबवू शकतात हे दाखविण्याची संधी मला सभागृहाने दिली आहे. 

वाई : जनगणना ही जातनिहाय करणे आवश्यक आहे. जातीपातीतील संघर्ष टाळण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे, तो मी घेतला आणि विधानसभेला जातीनिहाय जनगणनेचे महत्व पटवून दिले, असे मत विधानसभेचे सभापती नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केले.

श्री.पटोले खासगी दौ-यावर महाबळेश्वरला आले होते. मुंबईकडे जाताना ते सातारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्या निवासस्थानी थांबले. यावेळी भारतीय किसान काँग्रेस मोर्चाचे उपाध्यक्ष शाम पांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, किसन वीर कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पिसाळ, तालुका युवक अध्यक्ष प्रवीण अनपट मान्यवर उपस्थित होते. 

जातनिहाय जनगणना झाली तर सर्वसामान्यांना न्याय देणे शक्य होईल. जाती-जातीत भांडणे होणार नाहीत. आर्थिक व शैक्षणिकदृष्टया मागास समाजाला आरक्षणाचा लाभ देता येईल, असे सांगून श्री. पटोले म्हणाले, विधानसभेच्या अध्यक्षांचा नवीन परिचय माझ्या कामातून करून देणार आहे. लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत माझे अधिकार लोकांसाठी वापरून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राज्यात कोणकोणते उपक्रम राबवू शकतात हे दाखविण्याची संधी मला सभागृहाने दिली आहे. कोरोना प्रादुर्भाव नसता तर राज्यभरात जाण्याचे माझे नियोजन तयार केले होते. महाराष्ट्राच्या विकासाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली होती. राज्याचा स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आदी ज्येष्ठ नेत्यांनी विपरीत परिस्थितीत आपल्या वैचारिक प्रबोधन व राज्यात मोठा विकास करून महाराष्ट्राला उभे करण्याचे काम केले. 

नवीन पिढीने, कार्यकर्त्यांनी हा इतिहास दुर्लक्षित करता कामा नये. मात्र, सद्या हा विकास दुर्लक्षित करून काँग्रेस पक्षाची निंदा करून पक्ष बदनाम करण्याचा प्रयत्न इतर पक्षाकडून सुरु आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन राज्य व देश विकासातील काँग्रेसचे योगदान लोकांपर्यंत पोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

लोकांचे प्रश्न तातडीने सुटण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा आळस झटकण्याची गरज आहे. यासाठी या यंत्रणेच्या प्रमुखाला म्हणजे मुख्य सचिवांनाच का जबाबदार धरू नये, असे मंत्रिमंडळाला सुचविणार आहे. कोरोना प्रादुर्भावाने राज्याचे खूप मोठं नुकसान केलं आहे. हा संसर्ग किती दिवस त्रास देणार ते माहित नाही. यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

विराज शिंदे यांनी वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील प्रलंबित प्रश्नांचा उहापोह केला. तालुक्यात काँग्रेस सत्तास्थानी नसल्याने प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच विकास कामांसाठी कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे. काँग्रेसचा विचार गावागावात पोचविण्यासाठी युवक कार्यकर्ते निश्चित पुढाकार घेतील आणि पुन्हा जिल्हयातील काँग्रेसची गादी मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख