आगीतून फुफाट्यात पडलोय, असे म्हणण्याची वेळ येऊ देणार नाही.. - Bring NCP power in Kolhapur Zilla Parishad, Panchayat Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आगीतून फुफाट्यात पडलोय, असे म्हणण्याची वेळ येऊ देणार नाही..

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

राजीव आवळे यांना सांगू इच्छितो, कोरोनाचे संकट राज्यावर असताना सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका आम्ही सर्व मंत्र्यांनी घेतली. त्यामुळे यापुढेही आपण सर्वजण जबाबदारीने काम करूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जास्तीत सदस्य राष्ट्रवादीचे निवडून येतील व नगरपालिका व पंचायतीत राष्ट्रवादीचे घड्याळ कसे पोहोचेल यासाठी काम करावे लागणार आहे.

मुंबई  : कोरोनाचे संकट राज्यावर असताना सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांनी घेतली. त्यामुळे यापुढेही आपण सर्वजण जबाबदारीने काम करू या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यावेळेस कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत जास्तीत सदस्य राष्ट्रवादीचे कसे निवडून येतील व नगरपालिका व पंचायतीत राष्ट्रवादीचे घड्याळ कसे पोहोचेल यासाठी काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राजीव आवळे हे जनसुराज्य मधून राष्ट्रवादीत आले आहेत. त्यामुळे 'आगीतून उठून फुफाट्यात पडलोय' अशी परिस्थिती तुमच्यावर आम्ही येऊ देणार नाही, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.  

जनसुराज्य पक्षाचे नेते व माजी आमदार राजीव आवळे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. पी. पाटील, डी. के. चव्हाण, प्रकाश पाटील, संग्राम आवळे, सुधाकर कुलकर्णी, लता सुर्यवंशी, नितीन कामत, बाबू बनोरे, निलेश कायनात, आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, अधिवेशनाच्या गडबडीत असतानाच मला मुश्रीफ साहेबांनी उद्या थोडासा वेळ काढा. आपल्याला राजीव आवळेंचा पक्ष प्रवेश घ्यायचा आहे, असे सांगितले होते. मी त्यांना या कार्यक्रमास जरूर येईन असे सांगितले होते. त्यानुसार बैठकांतून वेळ काढून मी या कार्यक्रमास आलो आहे. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३० वर्षे काम करतोय, अनेक नवीन जुन्या कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या.

२००४ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे चार आमदार निवडुन आले होते. या चारचा ग्रुपमुळे आम्ही विनय कोरोंना मंत्रीमंडळात घेतले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काम करत होता. शेवटी आपण ज्या भागातून येतो त्या भागाचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशा प्रकारे राजीव आवळेंची भूमिका असायची. त्यावेळी ते अतिशय तरूण होते. गरीब व वंचितांसाठी ते काम करत होते. हातकणंगले व इचलकरंजी परिसरात त्यांचे चांगले काम आहे.

संघटना मजबूत करण्यासाठी राज्यात कुठेही कार्यक्रम किंवा जबाबदारी टाकली, तर ती पेलायला ते तयार आहेत. यावेळेस राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मंत्रीपदे देताना पवार साहेबांनी मला व जयंत पाटील यांना कोणाला कोणते मंत्रीपद द्यायचे यावर विचार करायला सांगितले होते. यावेळेस सामाजिक न्याय विभाग आम्ही राष्ट्रवादीकडे घेतला. त्यानुसार धनंजय मुंडेंना या खात्याची जाबाबदारी दिली.

राजीव आवळे यांना सांगू इच्छितो, कोरोनाचे संकट राज्यावर असताना सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका आम्ही सर्व मंत्र्यांनी घेतली. त्यामुळे यापुढेही आपण सर्वजण जबाबदारीने काम करूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जास्तीत सदस्य राष्ट्रवादीचे निवडून येतील व नगरपालिका व पंचायतीत राष्ट्रवादीचे घड्याळ कसे पोहोचेल यासाठी काम करावे लागणार आहे.

 नुकताच आपण पवार साहेबांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला. या वयातही देखील पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत असतात तरूणांना लाजवेल असे काम ते करतात. मी माझ्या राजकिय जीवनात अनेक लोकांना पाहिलेले आहे, अशा वयात काम करणारा नेता मी देशात पाहिलेला नाही. आता त्यांनी पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने वाटचाल करावी लागणार आहे.

पवार साहेबांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. वेळे मिळेल त्यावेळी ते तेथे जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. चांद्यापासून बांद्यपर्यंत पवार साहेबांचे लक्ष असते. नुकतेच ते दिल्लीला गेले होते. राजनाथ सिंह सह वरिष्ठ मंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिल्लीत आंदोलन सुरू असून देखील प्रश्न सोडविले जात नाहीत. आपल्या पक्षाची भूमिका मांडत असताना सर्व जाती धर्माला न्याय देणारे लोक आहेत, हे ध्यानात ठेवा.

आरक्षणे देताना इतरांना धक्का लागणार नाही, याची खबरदारी आमच्याकडून होईल, असा विश्वास देतो. राष्ट्रवादीत  प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. राजीव आवळे हे जनसुराज्य मधून राष्ट्रवादीत आलेत. ''आगीतून उठून फुफाट्यात पडलोय''अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ देणार नाही, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्र पक्षाचा बालेकिल्ला असून इतर भागातही मातंग समाज आणि दलित वर्गाला सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख