राज्यात अस्थिरता निर्माण करत मराठा समाजात फुट पाडण्याचा भाजपचा डाव  - BJP's instinct to create instability in the state and divide the Maratha community | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात अस्थिरता निर्माण करत मराठा समाजात फुट पाडण्याचा भाजपचा डाव 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याने ही मागणी होणे स्वाभाविकच आहे. मात्र ते नेतृत्व का करत नाहीत, हाच प्रश्न आहे. 

सातारा : भाजपचे नेते कोणाला तरी पुढे करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करण्याचा कुटनितीचा डाव खेळत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार ठाम असून सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत आहे. मात्र, आरक्षण प्रश्नावरून राज्यात अस्थिरता निर्माण करत मराठा समाजात फुड पाडण्याचा डाव भाजपकडून खेळला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर प्रत्यक्षपणे तर शरद पवारांसह माजी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शशिकांत शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्व पक्षियांची भावना आहे. मात्र लोकांमध्ये बुध्दीभेद करुन समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, उदयनराजे भोसले राज्य सरकारवर आरोप करत आहेत.

वास्तविक राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. न्यायालयातही भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असेल तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नीही सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने सुचना कराव्यात. यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

आरक्षणप्रश्नी भाजप काही लोकांना पुढे करुन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम केले आहे. समाजात दरी निर्माण करुन आपली पोळी भाजून अस्थिरता निर्माण केली जात आहे. वास्तविक मराठा समाज गेल्या पाच वर्षात एक झाला आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे या आरक्षणाला कोणाला दोषी धरणे योग्य होणार नाही.

गेल्या पाच वर्षात केंद्रात, राज्यात सत्ता असताना भाजपने आरक्षणाचा प्रश्न का मिटवला नाही, असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला. भाजपच्या नेत्यांनी अस्थिरता, राजकारण न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा,
यासाठी केंद्र सरकारने सुचना करावी. मात्र राज्य सरकारला दोष देण्याशिवाय भाजपचे नेते काहीच करताना दिसत नाहीत.

मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याने ही मागणी होणे स्वाभाविकच आहे. मात्र ते नेतृत्व का करत नाहीत, हाच प्रश्न आहे. 

उदयनराजेंचे म्हणणे हस्यास्पद..

फडणवीसांना मुख्यमंत्री करा, बघा आरक्षणाचा प्रश्न कसा मिटवतो असे उदयनराजे यांचे म्हणणे हस्यास्पद आहे. मागील पाच वर्षात फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणाचा विषय पुढे आला. मराठा बांधवांनी एकजूट आणून सरकारवर दबाव आणला. मात्र या पाच वर्षात फडणवीसांना हा प्रश्न मिटवता आला नाही. शेवटी दबाव वाढल्याने फडणवीसांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही. वास्तविक मराठा आरक्षण देताना राष्ट्रपतींची मंजुरी का घेतली गेली नाही, असा प्रश्नही आमदार शिंदे यांनी उपस्थित केला. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी सरकारला अस्थिर करण्याचे उद्योग थांबवावेत, असे ही त्यांनी स्पष्ट
केले.

सातारा पालिकेची निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार....

सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पॅनेल टाकणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, सातारा पालिकेची निवडणुक आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. नगरपंचायत व सर्व पालिकांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्मुला पालिका निवडणुकीत राबविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन झाला तर तसाही निर्णय घेण्यात येईल. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक राजकारण विरहित ठेवण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीत तसा प्रयत्न राहू शकतो. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. मात्र, सहकारात राजकारण येऊ नये अशी आमची कायमच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख