पदवीधर, शिक्षकच्या सर्व जागा भाजप जिंकणार : उदयनराजेंना विश्वास - BJP will win all the seats of graduates and teachers: Confidence to Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधर, शिक्षकच्या सर्व जागा भाजप जिंकणार : उदयनराजेंना विश्वास

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

उदयनराजे म्हणाले मतदारांच्या अपेक्षा असतात. त्या पुर्ण होत नसतील तर मतदारांचा दिशाभूल करण्यासारखा प्रकार आहे. आपण स्वतःशी खोटे बोलू शकत नाही. तसाच प्रकार त्यांचा आहे. मतदारांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही. लवकरच भाजप सत्तेत येईल, असा विश्वास उदयनराजेंनी यावेळी व्यक्त केला.

सातारा : केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी स्वार्थापोटी हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यांचे विचार वेगळे असून त्यांचा स्वार्थ साध्य झाला की ते आपापल्या मार्गाने निघून जातात. भाजप हा विचाराने एकत्र असून ध्येय व उद्दीष्ट निश्चित आहे. त्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकणार, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील महाराजा सयाजीराव विद्यालय येथील मतदान केंद्राच्या बाहेर उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, विधान परिषदेतील सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील. याचे प्रमुख कारण म्हणजे हे सर्व पक्ष यापुर्वी एकत्र नव्हते.

केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी ते एकत्र आले आहेत. ते स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. विचार सर्वांचे वेगळे आहेत. वेगवेगळ्या विचारांचे एकत्र येतात त्यावेळीस कोणते तरी अमिष अथवा ताकदीचा उपयोग करावा लागतो. ते कायमस्वरुपी एकत्र राहात नाहीत. कारण त्यांचा स्वार्थ साध्य झाला की ते आपापल्या मार्गाने निघून जातात.

भाजप हा पक्ष विचाराने एकत्र आहे. ध्येय उद्दीष्ट हे निश्चित आहे. त्यामुळेच सर्वजण कायमस्वरुपी एकत्र राहतात. बहुतांश मतदारसंघात मी गेलो होतो. तेथे हिच चर्चा होती. आपण यांना मदत करायची का. आगामी काळात हे आमदारकीच्या निवडणूकीत समोरासमोर लढणार आहेत. त्यामुळेच ते मदत करण्यास इच्छुक नाहीत. बोलणे सोपे असते. त्यामुळेच ते आम्ही एकत्र आहोत असे सांगत आहेत.

आम्ही हे केले, ते केले असे सत्ताधारी म्हणत आहेत. वास्तविक वर्षभरात त्यांनी काहीच केलेले नाही. मी टीका करीत नाही तर वस्तुस्थिती सांगतोय, असे उदयनराजेंनी नमूद केले. ते म्हणाले मतदारांच्या अपेक्षा असतात. त्या पुर्ण होत नसतील तर मतदारांचा दिशाभूल करण्यासारखा प्रकार आहे. आपण स्वतःशी खोटे बोलू शकत नाही. तसाच प्रकार त्यांचा आहे. मतदारांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही. लवकरच भाजप सत्तेत येईल, असा विश्वास उदयनराजेंनी यावेळी व्यक्त केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख