सातारा : विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवाची कारणे अनेक आहेत. यामध्ये प्रशासनाकडून मोठ्याप्रमाणात झालेले गफल्यांचा समावेश आहे. याबाबत येत्या १५ दिवसांत सहा पुराव्यांसहित सर्व माहिती प्रसारमाध्यमांपुढे मी मांडणार आहे. १८ जानेवारीपूर्वी आम्ही याबाबतची याचिका उच्च न्यायालय व निवडणूक आयोगाकडे दाखल करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीत पराभव झाल्याने वरिष्ठ नेत्यांकडून झापाझापी झाल्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत निवडणूका गांभीर्याने घेत आहात का, या प्रश्नावर श्री. पाटील म्हणाले, आम्ही सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेतो. अगदी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत सगळे एकत्र उतरतो. विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवाची अनेक कारणे आहेत.
यामध्ये मोठ्याप्रमाणात प्रशासनाकडून झालेल्या गफल्यांचा सामावेश आहे. याबाबत येत्या १५ दिवसांत सहा पुराव्यांसहित मी सर्व माहिती मांडणार आहे. त्यांना ईव्हीएम का नको, बॅलेट पेपरच का हवे, याची सगळी माहिती घेण्यास मी सुरवात केली आहे. ही माहिती मी सहा प्रात्यक्षिके दाखवून करणार आहे. यामध्ये एका बुथवर शेवटच्या साठ मिनिटात १३८ मतदान कसे होऊ शकते. एका मताला तीन मिनिटे लागतात.
अशा पध्दतीने पुणे पदवीधर मतदान केंद्रात ९०० पैकी ३०० बुथ आहेत. साठ मिनिटात काही ठिकाणी १३८ तर काही ठिकाणी १५७ मतदान झाले आहे. तर मराठवाड्यात तर पाच हजार मतपत्रिका कोरा निघाल्या. पाच, दहा मतपत्रिका कोऱ्या निघणे ठिक आहे, असे सांगून पाच हजार कोऱ्या मतपत्रिका कशा निघाल्या, असा प्रश्न उपस्थित करून येत्या १८ जानेवारीपूर्वी आम्ही याबाबत उच्च न्यायालयात आणि निवडणुक आयोगाकडे याचिका दाखल करणार आहे. त्यातून अनेक तथ्ये पुढे येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

