विरोधी नेत्यांच्या खच्चीकरणासाठीच भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर  - BJP uses central machinery to seduce the leaders of the Opposition Says Congress Leader Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधी नेत्यांच्या खच्चीकरणासाठीच भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

यापूर्वी राज्यात अशाप्रकारे अनेक नेत्यांना टार्गेट करत तुरुंगात टाकण्यात आले. अशा पद्धतीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांनाही तुरुगांत टाकले होते. यंत्रणांचा तपास झाला असेल, तर त्यातून काय पुढे आले, हे सुद्धा पुढे आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पक्ष आणि व्यक्‍ती बघून केंद्राकडून अशी कारवाई होते व त्याच धर्तीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची शक्‍यताही चव्हाण यांनी वर्तवली.

सातारा : भाजपच्या नाकर्तेपणामुळे राज्याची सर्वच क्षेत्रात पिछाडी झाली आहे. आपले कुकर्म लपविण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील विरोधी पक्ष मोडून काढण्यासाठी, त्यांच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे. ही कृती निषेधार्ह असल्याचे वक्‍तव्य करत खच्चीकरण करण्याच्या हेतूनेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची शक्‍यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली. 

महाविकास आघाडीचे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यासाठी श्री. चव्हाण कऱ्हाडात आले होते. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, "महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने संयुक्‍तपणे उमेदवार दिले आहेत. या दोन्ही उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने ते सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार बनले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही आज संयुक्‍त मेळावे घेतले, तसेच अनेक शिक्षण संस्थांना भेटी दिल्या. उद्या मी आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील उर्वरित ठिकाणी संयुक्‍त दौरे करणार आहे.

महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे.'' भाजपच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीला भेदण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. भाजपच्या नाकर्तेपणामुळे राज्याची सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. विरोधी पक्षांना मोडून काढण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. मलाही काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाची नोटीस आली. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांनाही ईडीने नोटिसा पाठविल्या होत्या. 

नोटिसा व केंद्रीय यंत्रणांचा वापर करत भाजप आकड्यांचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी नेत्यांना, विरोधी पक्षांच्या प्रमुखांना टार्गेट करत भाजप या संस्थांचा गैरवापर करत आहे. खरेच चूक असेल, तर कारवाई व्हावी, खटले भरा. यापूर्वी राज्यात अशाप्रकारे अनेक नेत्यांना टार्गेट करत तुरुंगात टाकण्यात आले.

अशा पद्धतीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांनाही तुरुगांत टाकले होते. यंत्रणांचा तपास झाला असेल, तर त्यातून काय पुढे आले, हे सुद्धा पुढे आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पक्ष आणि व्यक्‍ती बघून केंद्राकडून अशी कारवाई होते व त्याच धर्तीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची शक्‍यताही चव्हाण यांनी वर्तवली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख