सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत लोकांनी ज्यांना निवडून दिले आहे. त्यांची त्यांनी टर्म पूर्ण करावी, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर व्यक्त केले.
महापालिकेत येण्यासाठी मला निमंत्रण मिळाले आहे. वेळ मिळताच मी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुक प्रचार काळात मंत्री श्री. पाटील यांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे नगरसेवक आल्याची चर्चा सुरु होती. त्यावरुन सत्तांतराच्याही चर्चा सुरु झाली होती.
याबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, सांगली महापालिकेत लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे. त्यांनी त्यांची टर्म त्याच ठिकाणी पूर्ण करावी. महापालिकेत पक्षांतराचा विषयच येणार नाही. यासाठी मला कोणीही भेटलेले नाही. महापालिकेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री म्हणून मला भेटीचे निमंत्रण मिळालेले आहे.
सध्या मी दौऱ्यांत व्यस्त आहे. वेळ मिळताच मी महापालिकेत जाणार आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक प्रचार काळात मंत्री श्री. पाटील यांच्या संपर्कात भाजपाचा एक गट लागल्याची जोरदार चर्चा होती. भाजपचे सात नगरसेवक मंत्री श्री. पाटील यांच्या संपर्कात असून येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महापौर निवडीवेळी सत्तातरांची चर्चा जोरदार सुरु झालेली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री श्री. पाटील यांनी लोकांनी निवडून दिल्यामुळे ज्यांची त्यांनी टर्म पूर्ण करावी, असे म्हटले आहे. यामुळे मंत्री श्री. पाटील स्वतः पक्षांतरासाठी प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, राजकीय पक्षांत सत्तांतराची चर्चा सुरुच राहणार आहे.